मुंबईकरांना 100 टक्के पहिला डोस, 12 दिवसांचे टार्गेट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाला रोखण्यासाठी पालिका आणि खासगी अशा एकूण 475 व्हॅक्सिनेशन सेंटरवर लसीकरण सुरू असून दिवसाला 80 हजार ते एक लाखापर्यंत डोस देण्यात येत आहेत. यामध्ये 18 वर्षांवरील 90 लाख पात्र लाभार्थ्यांपैकी 97 टक्के लाभार्थ्यांना पहिला डोस देण्यात आला असून ऑक्टोबरअखेर सर्व मुंबईकरांचा पहिला डोस देऊन पूर्ण होणार आहे. तर 65 टक्के जणांचे लसीकरण पूर्ण होणार आहे.

मुंबईत 16 जानेवारीपासून लसीकरण सुरू करण्यात आले. यामध्ये पालिका, राज्य सरकार आणि खासगी केंद्रांवर लाभार्थ्यांना डोस देण्यात येत आहेत. यामध्ये पालिकेला अनेक वेळा पुरेसे डोस मिळाले नसल्याने लसीकरणाला बेक लागला असला तरी पालिकेने योग्य नियोजनातून लसीकरण पूर्ण करण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू केली आहे. यामध्ये 2 ते 18 वर्षांपर्यंतच्या मुलांच्या लसीकरणासाठी पालिकेच्या नायर रुग्णालयात सुरू करण्यात आलेली ‘ट्रायल’ही यशस्वी ठरली आहे.

देशात 99 कोटी लसीकरण

देशात 99 कोटी जनतेचे लसीकरण पूर्ण झाल्याचे ट्विट केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडवीया यांनी केले आहे. लवकरच 100 कोटींचा टप्पा गाठू, असेही त्यांनी म्हटले आहे.

आता पालिका लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणार

लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करण्यासाठी पालिका आता शिल्लक लाभार्थ्यांपर्यंत स्वतः पोहोचणार आहे. यासाठी पालिका सोसायटय़ा, झोपडपट्टय़ांमध्ये विशेष कोरोना लसीकरण शिबीर आयोजित करणार आहे.

1 नोव्हेंबरपासून व्यापक प्रमाणात सुरू होणाऱया उपक्रमात टॅक्सी ड्रायव्हर, फेरीवाले, दुकानदार यांच्यासाठीही विशेष लसीकरण आयोजित करण्यात येईल. यासाठी मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून फिरती लसीकरण केंद्रेही सुरू करण्यात येतील.

असे झाले लसीकरण

18 वर्षांवरील पात्र लाभार्थी 90 लाख
एकूण डोस दिले
1 कोटी 35 लाख 15 हजार 111
पहिला डोस घेतलेले
86 लाख 29 हजार 807
दुसरा डोस घेतलेले
48 लाख 85 हजार 304