
प्रदेश काँग्रेसमधील नव्या नियुक्त्यांवर नाराज झालेले सचिन सावंत यांनी प्रवक्तेपदाचा राजीनामा थेट पक्षाच्या हायकमांडकडे पाठवून दिला आहे. मात्र पक्षाच्या सरचिटणीसपदाची जबाबदारी त्यांच्यावर कायम आहे.
प्रदेश काँग्रेसच्या फेरबदलात पक्षाचे प्रवक्ते सचिन सावंत नाराज झाले आहेत. प्रवक्तेपदावर असताना त्यांनी काँग्रेसवर झालेल्या आरोपांना उत्तर दिले होते. चिक्की घोटाळ्यापासून पालघरमध्ये झालेली साधूंची हत्या, सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण, सेलिब्रेटींचे ड्रग्ज प्रकरण, शिवस्मारकाच्या कामातील गैरप्रकार अशा विविध मुद्दय़ांवर भाजपला जेरीस आणले होते.
जबाबदारीतून मुक्त करा
मात्र सचिन सावंत यांनी राजीनामा दिला नसून जबाबदारीतून मोकळे करा अशी विनंती केल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. मागील दहा वर्षे प्रवक्तेपदाची त्यांच्यावर जबाबदारी होती. आता आत्मसन्मान व प्रतिष्ठा राखली जाईल असे पद देण्याची विनंती पक्षाला केल्याचा दावा त्यांच्या निकटवर्तीयांनी केला. पक्षात नवीन कामाचा अनुभव घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे जबाबदारीतून मोकळे करा. नवीन जबाबदारीतून अनुभव वाढेल असे त्यांनी पक्षाला पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे.



























































