
वेश्या व्यवसायातून बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी ज्या तरुणीला मदत केली ती तरुणी आता वेश्या दलालीचे काम करताना पकडली गेली. परराज्यातील ग्राहकांसाठी तरुणी पुरविण्याचे काम तिने सुरू केले होते. दोन तरुणींसह स्वतः वेश्या व्यवसाय करण्यासाठी विमानाने गोव्याला घेऊन निघालेल्या वर्षा परमार या दलाल महिलेस युनिट-7 च्या पथकाने विमानतळावरच बेड्या ठोकल्या.
झटपट पैसा कमावण्याच्या हव्यासापोटी वर्षा आता बहिणीसोबत मिळून वेश्या दलालीचे काम करू लागली. ती स्वतःसोबत महिला सहकारी अबरून अहमद खान आणि अन्य दोघी तरुणींना गोव्याला वेश्या व्यवसायासाठी घेऊन जात असल्याची खबर युनिट-7 चे प्रभारी निरीक्षक मनीष श्रीधनकर यांना मिळाली. त्यानुसार श्रीधनकर, निरीक्षक प्रिया थोरात, एपीआय ओळेकर, उपनिरीक्षक स्वप्नील काळे व पथकाने मुंबई विमानतळावर सापळा रचला. दरम्यान, वर्षा तिची सहकारी व अन्य दोघी तरुणींना गोव्याला जाण्यासाठी विमानतळावर येताच पोलिसांनी तिला पकडले. वर्षा व अबरूनला अटक करून अन्य दोघींची रवानगी सुधारगृहात करण्यात आली.
अशी आहे मोडस ऑपरेंडी
वर्षा परराज्यातील क्लायंट शोधते. मग संबंधितांशी संपर्क साधून वेश्यागमनासाठी तरुणींचे फोटो पाठवून त्यांचा रेट ठरवते. शिवाय ज्या राज्यात किवा शहरात तरुणींना पाठवायचे असेल तेथील क्लायंटकडून तरुणींच्या प्रवासासाठी विमानाचे तिकीट, तेथील हॉटेलात राहण्याची सुविधा करून घेते. 40 ते 50 हजारांत ती तरुणींचा सौदा करायची. तरुणींकडून त्यांना मिळणाऱ्य़ा रकमेपैकी वीस टक्के ती आपले कमिशन घ्यायची.




























































