मुरगूडमध्ये सर्वपक्षीयांकडून रास्ता रोको

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हायब्रिड ऍन्यूटी तत्त्वाचा जिह्यातील पहिलाच पायलट प्रोजेक्ट असलेल्या लिंगनूर ते दाजीपूर या 70 किलोमीटर लांबीच्या व 202.45 कोटी रुपये खर्चाच्या आंतरराज्य मार्गाच्या कामाला तीन वर्षांपासून ग्रहण लागले आहे. अवघे 35 टक्के काम पूर्ण झाले असून, तेही निकृष्ट दर्जाचे आहे. ठेकेदाराने पळ काढल्याने प्रवाशांना सोसाव्या लागत असलेल्या यातनांचा भडका आजच्या सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलनात उडाला. या आंदोलनाची धग जिल्हाधिकाऱयांपर्यंत पोहोचली. जिल्हाधिकाऱयांच्या दालनात उच्चस्तरीय समितीची बैठक घेण्याचे आश्वासन कागलच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.

मार्च 2019 साली हायब्रिड ऍन्यूटी या तत्त्वानुसार लिंगनूर ते दाजीपूर या महत्त्वाच्या आंतरराज्य मार्गाचे काम प्रत्यक्षात सुरू झाले. 2020 ला कामाची मुदत संपली. मात्र, अवघे 35 टक्के काम पूर्ण झाले आहे. रस्त्यावर पडलेले खड्डे, निकृष्ट काम, परिसरात पसरणारी धूळ आणि सातत्याने होणारे अपघात यामूळे हा रस्ता प्रवासासाठी धोकादायक बनला आहे. याविरोधात अनेकदा आंदोलने झाली. मात्र, आश्वासनापलीकडे काहीच न झाल्याने प्रवासी वर्गात प्रचंड रोष होता. त्या विरोधात आज सर्वपक्षीय आंदोलनाची हाक दिली होती. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. सकाळी 8 वाजता सुरू झालेल्या आंदोलनात आपली बाजू मांडण्यासाठी ठेकेदार कंपनी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रतिनिधी आले होते. मात्र, जिल्हाधिकाऱयांनी प्रत्यक्ष येऊन जनतेच्या वेदना समजून घ्याव्यात, यावर आंदोलक ठाम होते. मात्र, जिल्हाधिकारी नियोजित बैठकीत व्यस्त असल्याने तहसीलदार ठोकडे यांनी आंदोलकांचा जिल्हाधिकाऱयांशी संवाद घडवून आणला. जिल्हाधिकारी चार दिवसांत उच्चस्तरीय बैठक घेतील, असे आश्वासन ठोकडे यांनी दिल्यावर आंदोलन स्थगित करण्यात आले. दरम्यान, जिल्हाधिकाऱयांच्या बैठकीत आपेक्षित निर्णय न झाल्यास मंगळवार, दि. 26 ऑक्टोबरपासून दहा गावांत साखळी पद्धतीने आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.

नगराध्यक्ष राजेखान जमादार, शिवसेनेचे शहरप्रमुख, नगरसेवक नामदेव मेंडके, कॉ. बबन बारदेस्कर, जोतीराम सूर्यवंशी, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विकास पाटील, नगरसेवक सुहास खराडे, सरपंच दिलीप पाटील, विक्रम पाटील, सोमनाथ एर्नाळकर, अमित पाटील, जयवंत पाटील, नितीन खराडे, रणजित सूर्यवंशी, दिग्विजय पाटील, आदमापूरचे सरपंच विजय गुरव, दत्ता पाटील, डॉ. सुभाष हिंगणे यांच्यासह अनेकजण या आंदोलनात सहभागी झाले होते.