
हिंदुस्थानने गुरुवारी कोरोना लसीकरणात मोठा विक्रम केला आहे. देशात 100 कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. लसीकरणात 100 कोटींचा टप्पा पार केल्याबद्दल समाधान व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांचे अभिनंदन केले आहे. त्यांनी याच श्रेय आरोग्य कर्मचाऱ्यांना दिले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील अंदाजे 75% प्रौढ लोकसंख्येला पहिला डोस मिळाला आहे, तर 31% लोकांचे पूर्णपणे लसीकरण करण्यात आले आहे.
हिंदुस्थानात कोविड -19 लसीकरणाची संख्या 100 कोटी पार केल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत की, ”हिंदुस्थानने आज इतिहास रचला आहे. आपण 130 कोटी हिंदुस्थानी आज हिंदुस्थानच्या विज्ञान, उद्योग आणि सामूहिक भावनेच्या विजयाचे साक्षीदार आहोत. 100 कोटी लसीकरणाचा टप्पा पार केल्याबद्दल हिंदुस्थानचे अभिनंदन. आपल्या डॉक्टर, परिचारिका आणि प्रत्येकाने ज्यांनी ही कामगिरी साध्य करण्यासाठी काम केले त्यांचे आभार.”
आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, हिंदुस्थानला 10 कोटी लसीकरणाचा आकडा पार करण्यासाठी 85 दिवस, 20 कोटी आकडा पार करण्यासाठी सुमारे 45 दिवस आणि 30 कोटींचा टप्पा गाठण्यासाठी आणखी 29 दिवस लागले. देशाला 30 कोटी डोसमधून 40 कोटींचा टप्पा गाठण्यास 24 दिवस लागले आणि नंतर 100 कोटींचा टप्पा पार करण्यासाठी 76 दिवस लागले. एकूण लसीच्या डोसपैकी 65% पेक्षा जास्त ग्रामीण भागात वापरला गेला आहे.



























































