
कोरोनापश्चात या लॉक डाऊनच्या प्रचंड मोठय़ा संकटकाळात असलेली नोकरी टिकवून ठेवणे हेच मुळात अवघड होत चालले आहे व नवीन नोकरी मिळणेही. त्यामुळे व्यवसाय करावा किंवा आपल्या आवडीच्या गोष्टी कराव्यात असे वाटणे मनाला कितीही आकर्षित वाटत असले तरीही संधी, मार्ग, भांडवल, पायाभूत सुविधा इत्यादी अनेक गोष्टींचे अडथळे पार पाडणे ही मोठीच शर्यत होऊन बसते. जरी हे अडथळे पार केले तरीही जम बसविण्यासाठी जास्तीत जास्त मागणी निर्माण होणे हे गरजेचे आहे. ही मागणी परत लोकांच्या गरजा, उत्पन्न व क्रयशक्ती यावर अवलंबून असते. हे सगळे एकमेकांशी निगडित व परस्परसंबंधित आहे.
अशा परिस्थितीत आहे ती नोकरी करत राहणे, मग आपल्या आतील कलाकार झुरत राहिला, मरत राहिला तरीही जीवन जगण्यासाठी व कौटुंबिक जवाबदारी पार पाडण्यासाठी दुसरा मार्ग नसतो, परंतु एखाद्या व्यक्तीने या विषम परिस्थितीवर मात करत आपल्या आतल्या कलाकाराला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न सातत्याने सुरूच ठेवला तर त्याच्या या प्रयत्नांना दाद देणे व त्याला प्रोत्साहन देणे एवढे तर आपण नक्कीच करू शकतो.
असाच एक सृजनशील कलाकार. रहेजा स्कूल ऑफ आर्टमध्ये शिकलेला. चंद्रशेखर जाधव हे आहे या कलाकाराचे नाव, जो अंबरनाथचा रहिवासी असून मध्य रेल्वेच्या भायखळा येथील कार्यालयात रेल्वे कर्मचारीही आहे. अनेक वेळा मेगाब्लॉक घेऊन तर विशेषतः पावसाळ्यात अचानकपणे केव्हाही रेल्वेच्या मार्गावर सिग्नल यंत्रणा, तारांची दुरुस्ती अशी कामे नियमित स्वरूपात पार पडत असतात. रेल्वेची चतुर्थ श्रेणी कामगारांची पूर्ण टीम त्यावर काम करत असते व रेल्वे सेवा सुरळीतपणे सुरू ठेवण्यासाठी ते रात्रंदिवस झटत असतात.
पण एका कलाकाराचे मन तेथे रमत असेल का? हा प्रश्न मी शेखरला विचारला तेव्हा तो हसून म्हणाला, कसे रमेल, पण काम हे आपले कर्तव्य आहे, कर्तव्य पार पाडताना इतर गोष्टींचा विचार बाजूलाच ठेवावा लागतो. कधी कधी तर तीन तीन शिफ्टमध्येही सलग काम करावे लागते. जोखीम मोठी आहे. भान, लक्ष ठेवावे लागते. आमच्या काही सहकाऱयांच्या जीवावरही बेतले आहे. त्यामुळे संपूर्ण लक्ष देऊनच ते पार पाडावे लागते. मुंबईची संपूर्ण रेल्वे सेवा त्यावर अवलंबून आहे.
अजून तरी मला माझ्या पोटापाण्यासाठी कुटुंबासाठी मिळकतीचे साधन म्हणून चित्रकला या माध्यमावर संपूर्ण विसंबून राहता येत नाही. माझे शिक्षण आणि माझी पदवी जरी त्या क्षेत्रातील असली तर अद्याप तरी त्याला एक हौस म्हणूनच मला पाहावे लागते. जेव्हा जसा वेळ मिळतो तेव्हा तेव्हा तसे मी माझ्यातील कलाकाराला घडवीत असतो. चंद्रशेखरने लतादीदी व आशाताईंचे पेन्सिल रेखाचित्र तयार केले. दिलेल्या फोटोवरून त्याने मोठय़ा परिश्रमाने हुबेहूब ती दोन्ही रेखाटली. त्याच्या दोन फ्रेम्स बनवून ती लतादीदींना सादर केली. कौतुकाने त्यांनी चंद्रशेखरशी फोनवरून बोलणेही केले. त्याला खूप आनंद वाटला. आजही फोनवरचे लतादीदींचे ते बोलणे रेकार्ंडग त्याने जपून ठेवलेले आहे.
आता काही दिवसांपूर्वी मला शेखर पुन्हा भेटला तेव्हा इंटरनेटवरून इपॉक्सि रेझिन या नावाची गोष्ट त्याला सतत खुणवत होती. कलाकाराचे मन अशा एखाद्या गोष्टीकडे आकृष्ट झाले की, ते त्याला शांत बसून देतच नाही. लॉक डाऊनमधील रेल्वेची सरकारी नोकरी सांभाळतच शेखरने या इपॉक्सि रेझिनची माहिती मिळवत त्यावर काम करायला सुरुवात केली आहे. मुळातच कलाकाराचे मन आणि हात असल्याने तो निर्माण करत असलेल्या कलाकृतींमध्ये कमालीची विलोभनीयता आहे. लाकडाच्या ओंडक्यांना इपॉक्सी रेझिनने एक वेगळेच स्वरूप देऊन आकर्षक फर्निचर तयार करण्याचे प्रयत्न शेखर करत आहे. या प्रकारचे फर्निचर मोठमोठय़ा रिसॉर्ट, चित्रपटांच्या सेटवर, आंतरराष्ट्रीय तारांकित हॉटेल्स, मोठमोठे राष्ट्रीय वा आंतरराष्ट्रीय प्रोजेक्टस् यामधून वापरले जाते.
एक रेल्वे कर्मचारी आपली नोकरी सांभाळत असतानाच आपल्यातील कलेला आणि कलाकाराला नवनिर्मितीच्या आव्हानात्मक क्षेत्रात पडताळून पाहण्याची जिद्द बाळगून आहे हे पाहून खूप आनंद वाटला. नोकरीतील समाधान कायम राखून कलेतील उत्कर्ष साधण्याच्या चंद्रशेखर जाधव याच्या प्रयत्नांना दाद द्यायला हवी आणि प्रोत्साहनही!
- प्रसाद पाठक

























































