
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्क्यांची वाढ झाली आहे. केंद्र सरकारने गुरुवारी हा निर्णय जाहीर करून कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी खूशखबर दिली. या निर्णयामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता 31 टक्के दराने महागाई भत्ता मिळणार आहे. हा वाढीव भत्ता 1 जुलैपासूनच लागू असेल.
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी हा निर्णय जाहीर केला. या निर्णयाचा केंद्र सरकारच्या सेवेतील 47.14 लाख कर्मचारी आणि 68.62 लाख पेन्शनर्सना लाभ मिळणार आहे. याचा सरकारी तिजोरीवर 9488.74 कोटी रुपयांचा भार पडणार आहे. कोरोना महामारीमुळे सरकारने जानेवारी 2020 ते जून 2021 या कालावधीत तीन वेळेला महागाई भत्त्यात वाढ दिली नव्हती. जुलैमध्ये ती स्थगिती हटवली.


























































