स्मृतिगंध – झुंजार नेतृत्व

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> विनायक श्री. अभ्यंकर

‘इंदिराजी’…चारच अक्षरांचा हा शब्द इंडियाई आणि म्हणूनच आदरणीय व नतमस्तक करावयास लावणारा. सुस्वरूप मातेच्या सुहास्य वदनावर कठोर, पण करारी भावांचे दर्शन साऱया राष्ट्राला झाले ते याच काळात आणि मग एका निग्रही ललनेच्या लष्करी नेतृत्वाला धार चढली व आधुनिक काळातील या महिषासुरमर्दिनीला डोक्यावर घेऊन बेहोशीत नाचला तो सारा हिंदू समाज, परंतु बांगलादेश मुक्तीसंग्रामातील ऐतिहासिक विजयाच्या पाठीशी होता एका दूरदर्शी व कालबद्ध प्रक्रियेचा अथक प्रयास. तो यशस्वी झाला इंदिरा गांधींच्या झुंजार नेतृत्त्वामुळे…

इंदिराजींच्या लष्करी नेतृत्वाचा एक पैलू म्हणजे त्यांनी बेमालूमपणे न डगमगता जाहीर केलेला एक्स्कलुजिव्ह इकॉनॉमिक झोनचा सागरी कायदा. या कायद्यानुसार परकीय बोटी व जहाजांना हिंदुस्थानी जलसीमेच्या चाळीस मैल सागरी अंतरात स्वैराचारास बंधन व मासेमारी इत्यादीवर बंदी. समुद्रात सापडणाऱया तेलांच्या साठय़ांचे संरक्षण हाही मुख्य उद्देश यात होताच. सागरी तेल संशोधनात हिंदुस्थानी सर्व्हे शिप्सचा त्यांनी पुरेपूर व यशस्वी वापर करून सागरसम्राट उभे केले. आज क्रूड ऑईल उत्पादित करणाऱया राष्ट्रांत हिंदुस्थान वरच्या रांगेत आहे.

स्थळ – पंतप्रधानांचे कार्यालय, वेळ – रात्री अंदाजे 10 नंतरची, तारीख 3 डिसेबर 1970, मुक्काम – राजधानी दिल्ली. सेनाभवन ते पंतप्रधानांचे कार्यालय यामध्ये लष्करी व मुलकी उच्चपदस्थांची वाढत चाललेली वर्दळ. इतक्यात राष्ट्रपती भवनातून तत्कालिन राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी यांची आणीबाणीची घोषणा आणि त्याच वेळी आकाशवाणीवर निवेदन ‘‘अब थोडी ही देर मे सुनिये प्रधानमंत्री का देश के नाम एक खास संदेश…’’

सारे राष्ट्र प्राण कानात ओतून रेडिओ सेटजवळ उत्सुकतेने एकत्र जमून वाट पाहत होते वीरमाता इंदिराजींच्या बुलंद, परंतु धीरगंभीर आवाजाची आणि बाराच्या सुमारास त्यांनी राष्ट्राला हाक दिली, ‘‘बांधवांनो, मानवी हक्कांच्या स्थापनेसाठी व शांततेचे सर्व प्रयत्न विफल ठरल्यावर आमचा देश आता शत्रूला जेरबंद केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. तेव्हा त्यागाला तयार व्हा. भारतमातेच्या संरक्षणासाठी आम्ही आता युद्धाला सामोरे जात आहोत. जयहिंद!’’

बांगलादेशाच्या मुक्तीचे निर्नायकी प्रयत्न करण्यासाठी कोलकात्याला गेलेल्या इंदिराजींना दिल्लीत येऊन ही साद हिंदुस्थानवासीयांना देण्याचे कारण होते पाकचा नापाक हमला. सारे भेदभाव विसरून तेव्हा हिंदुस्थानी समस्त जनता एकत्र तर झाली, तर या राष्ट्रीय आपत्तीच्या काळात सर्व राजकीय पक्षांनी आपले झेंडे गुंडाळून तिरंग्याच्या रक्षणार्थ अग्रेसर झाले. कारण प्रथमतः ते सर्व हिंदुस्थानी होते.
1962 चे चिनी आक्रमण आणि त्यात राजकीय नाकर्तेपणा व स्वप्नाळू नेतृत्वाचा झालेला पराभव, 1967 चे युद्ध ज्याने हिंदुस्थानी सेनेच्या आशा पुनरपी पल्लवित होत असतानाच ‘ईंट का जवाब पत्थर से ढेंगे!’ ही कडवी झुंज देणाऱया वामनमूर्ती बहादुराची जागतिक दबावात गेलेली आहुती, याच वेळी स्वपक्षात माजलेली बजबजपुरी व आर्थिक मंदीची हिंदुस्थानला लागलेली झळ, या सर्व संकटांचे ओझे डोक्यावर घेऊन इंदिराजी प्रधानमंत्रीपदावर आरूढ झाल्या. सद्गुणांचा अतिरेकसुद्धा कधी कधी गुन्हा ठरतो. तद्वतच शांती, अहिंसा, बंधुभाव यांचे अजीर्ण झालेल्या नेतृत्वाला झुगारून इंदिराजींनी जग काय म्हणेल याची तमा न बाळगता हिंदुस्थानी सैन्याच्या फेररचनेचे व आधुनिकीकरणाचे सत्र सुरू केले. पूर्वीच्या सरकारमधील व इंदिराजींच्या सरकारमधील हा मूलभूत फरक.

1968-69 साल. इंदिराजींनी स्वतः हिंदुस्थानी नौसेनेची पाहणी करून नवीन करार-मदार घडवून आणले. विक्रांत या जहाजावर स्वतः खोल समुद्रात जातीने आरमारी युद्धाचा अभ्यास करत अंदमान – निकोबारजवळील छोटय़ा छोटय़ा बेटांना भेट देऊन तेथील जनतेत हिंदुस्थानीत्वाची जाण जागृत केली. कारण चिनी राज्यकर्ते आपल्या टू मेन बोटस्मधून या बेटांवर शिरकाव करत होते. या त्यांच्या आरमारी मुशाफिरीचा मी स्वतः साक्षीदार आहे. कारण मीही तेव्हा विक्रांतवर सेवारत होतो. आम्ही तेव्हा त्यांच्या आदराप्रीत्यर्थ एक खास मनोरंजनाचा कार्यक्रम फुरसतीच्या वेळात दूरवर खोल समुद्रात पेश करून त्यांना सुखद आश्चर्याचा धक्का दिला होता. कारण जहाज चालू असताना फ्लाइंग डेकच्या मूव्हिंग लिफ्टवर स्टेज बनवून केलेला तो करमणुकीचा कार्यक्रम म्हणजे प्रायोगिक नाटकाचा तो लष्करी प्रयोग झाल्यावर त्यांनी स्वतःहून आमच्यासोबत एक पह्टो काढून घेतला.

इंदिराजींनी या सागरी मुशाफिरीत अंदमान-निकोबार बेटांजवळच्या शंभरहून जास्त द्वीपसमूहांना भेट देऊन त्यांना हिंदुस्थानात सामावून घेतले. म्हणूनच आज ही सारी बेटे हिंदुस्थानच्या नकाशावर विराजमान आहेत. नाहीतर चीनने ती गिळंकृत केली असती.

विक्रांतच्या खलबतखान्यात अॅडमिरल नंदा व इतर वरिष्ठ सेनापतींबरोबर चर्चा होऊन नवीन करार-मदार ठरले आणि मग हिंदुस्थानी आरमाराला सुसज्ज करण्यासाठी रशिया व इतर राष्ट्रांची मदत घेण्याचे ठरून विशाखापट्टणम मुक्कामी पाणबुडी प्रशिक्षण पेंद्र वीरबाहूची मुहूर्तमेढ रोवण्यात आली.

यातही इंदिराजींनी एक आपल्या खास लष्करी मुत्सद्देगिरीची चुणूक दाखवली. अमेरिका पाकसारख्या दुर्बल राष्ट्राला गाझीसारखी न्यूक्लिअर पाणबुडी देऊन गोंजारत आहे हे पाहून शहास काटशह या न्यायाने आपल्या राजकीय बुद्धिचातुर्यावर इंदिराजींनी तुलनेने जवळ व वेळप्रसंगी चीनला जेरबंद करण्यास उपयोगी म्हणून रशियन नेत्यांना जवळ केले व रशियन जहाजे, पाणबुडय़ा, विमाने, हेलिकॉप्टर पेटिया छास, पेट्रोलिंग शिप्स विकत घेऊन अमेरिकेला सुयोग्य प्रत्युत्तर दिले. हे करत असताना 1971 च्या ऑगस्टमध्ये रशियाबरोबर त्यांनी घडवून आणलेला करार पाहून तर सारेजण स्तिमित झाले. त्याची प्रचीती बांगलादेशच्या युद्धात आली.

हिंदुस्थानी आरमाराने स्वावलंबी व्हावे म्हणून लिएंडर क्लास फ्रिगेटची निर्मिती करणारा प्रकल्प हेसुद्धा इंदिराजींचे कर्तृत्व. 90 टक्के हिंदुस्थानी बनावटीच्या या बोटी माझगावच्या गोदीत तयार होऊन 1970 ते 80 या दशकात आरमारी सेवेत रुजू झाल्या व जहाज बांधणीच्या क्षेत्रातही आम्ही इतकी मुसंडी मारली की, आज ठरवले तर आम्ही न्यूक्लिअर सबमरीनसुद्धा बनवू शकतो. या हिंदुस्थान निर्मित जहाजांना तिसऱया जगातून मागणी होत असून हिंदुस्थानी कोषागारात परकीय चलनाचा साठा वाढत आहे.

भूदल सेनेला जर आधुनिक युद्धतंत्रात शत्रू प्रदेशात मुसंडी मारावयाची असेल तर नभांगणातही एअर कव्हरेज बलशाली असणे महत्त्वाचे आहे हे ओळखून इंदिराजींनी एच.ए.एल या कारखान्याचे आधुनिकीकरण केले व मिग, जॅगरनॉट ही गगनभेदी विमाने संपादन करून वायुसेनेची फेरजुळवणी केली. पंबाइंड ऑपरेशनल थिअरी ध्यानात घेऊन त्यांनी भूदल-जल-वायुदल यांची उत्तम सांगड घालून तिन्ही दलांत सुसूत्रता आणली. तिन्ही सशस्त्र्ा सेनादलात एकोपा व परस्परसुदृढ संबंध असणे हे सामर्थ्यशाली संरक्षण व्यवस्थेचे महत्त्वाचे लक्षण असते. आपत्तीच्या काळात हा एकोपा विजयी लक्ष्याकडे नेतो.

आज रणांगणाच्या कक्षा रुंदावल्या असून युद्धभूमी ही युद्धक्षेत्रापुरती मर्यादित राहिलेली नाही. विज्ञानामुळे संहारक शस्त्रास्त्रांमध्ये रोज नवनवीन शोध लागत असून युद्ध हे घराच्या उंबरठय़ापर्यंत पोहोचू पाहत असून त्याला दहशतवाद खतपाणी घालत आहे. तेव्हा सैन्यातल्या एकोप्याप्रमाणे सामाजिक जाणीव प्रगल्भ होणे महत्त्वाचे आहे. हे राष्ट्र माझे आहे हा भाव समाजात निर्माण झाल्यास मुंबई हल्ला, पठाणकोट हल्ला व पंचमस्तंभीयांचे राष्ट्रविरोधी कट होणार नाहीत.
(लेखक निवृत्त नौसेना अधिकारी आहेत.)