
डिग्री कॉलेजमधील तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांच्या मानधनात वाढ करण्याची मस्ट (महाराष्ट्र धर्मनिरपेक्ष शिक्षक संघटना) ची मागणी राज्य सरकारने अखेर मान्य केली आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाने या प्राध्यापकांच्या मानधनवाढीचा अध्यादेश जाहीर केला असून वेतनवाढीची अंमलबजावणी सुरू झाली आहे.
डिग्री कॉलेजमध्ये काम करणाऱ्या आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, शारीरिक शिक्षण आणि विधी महाविद्यालयातील शिक्षकांना केवळ 300 रुपये प्रतितास एवढे तुजपुंजे मानधन मिळत होते. पुढे ते प्रतितास 500 रुपये करण्यात आले. मात्र आता नव्या आदेशानुसार 625 रुपये प्रतितास इतके मानधन मिळणार आहे. त्यामुळे या प्राध्यापकांना सुमारे 25 टक्के इतकी वेतनवाढ देण्यात आली आहे. तसेच शारीरिक शिक्षण आणि विधी महाविद्यालयातील पदवी व पदव्युत्तर शाखेतील शिक्षकांना 750 रुपये प्रतितास मानधन मिळणार असून प्रात्यक्षिकाच्या मानधनातदेखील 250 तर विधी आणि शारीरिक शिक्षण शाखेसाठी 300 रुपये प्रतितास इतकी वेतनवाढ करण्यात आली आहे .
गेली दोन वर्षे ‘मस्ट’ संघटना सरकारकडे तासिका तत्त्वावरील शिक्षकांच्या मागण्यांसंदर्भात आग्रही होती, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रा. विजय पवार यांनी दिली. संघटनेची मागणी मान्य केल्याबद्दल प्राध्यापकांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांचे आभार मानले आहेत. तसेच संघटनेच्या या मागण्यांसाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करणाऱ्या संघटनेच्या प्रमुख सल्लागार आमदार मनीषा कायंदे, सुधीर तांबे यांचेदेखील संघटनेने अभार मानले आहेत. संघटनेच्या या लढय़ात महासचिव डॉ. शांतज देशभ्रतार, उपाध्यक्ष डॉ. निलेंद्र लोखंडे, खजिनदार डॉ. निर्मला पवार यांनी भरीव योगदान दिले.



























































