
मुंबई गोवा महामार्गावरील भोस्ते घाटातील अवघड वळणावर सुरु झालेली अपघाताची मालिका सुरुच आहे. याच वळणावर रविवारी मालवाहू कंटेनर उलटून अपघात झाला. गेल्या आठ दिवसात या वळणावर झालेला हा तिसरा अपघात आहे. एकाच ठिकाणी वारंवार अपघात होत असल्याने चौपदरीकरणादरम्यान अवघड वळणाचे काम योग्य झाले नसल्याची चर्चा आहे.
महामार्गाचे चौपदरीकरण झाल्यापासून गेल्या वर्षभरात या वळणावर 60 ते 70 वाहनाचे अपघात झाले आहेत. अनेकजण यामध्ये जखमीही झाले आहेत. मात्र, या वळणावर अपघात होऊ नये यासाठी उपाययोजना करण्यात येत नाहीत. आतापर्यंत या वळणावर झालेले अपघात मालवाहू ट्रक, टेम्पो, कंटेनरचे आहेत. मात्र, या ठिकाणी एसटी किंवा प्रवासी बसला अपघात झाला तर मोठा धोका आहे. महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित कंपनीला या वळणावर अपघात होणार नाही यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना कराव्यात अशी मागणी होत आहे.
गेल्या आठवड्यात याच वळणावर लागोपाठ दोन मालवाहू कंटेनर उलटले होते. या घाटात चालक आणि क्लीनर जखमी झाले होते. या दोन्ही अपघातांना चार दिवस उलटले नाही तोच आज पुन्हा एकदा त्याच ठिकाणी मालवाहू कंटेनर उलटला आहे.


























































