
भाजपवासी झालेले आमदार हर्षवर्धन पाटील यांच्या ‘भाजपमध्ये आल्यापासून ईडी वगैरेचा त्रास नाही, शांत झोप लागते’ या विधानापाठोपाठ असेच विधान भाजप खासदार संजय काका पाटील यांनी केले आहे. ‘माझ्यामागे ईडी लागणार नाही. मी भाजपाचा खासदार आहे. त्यामुळे ईडी इकडे येणार नाही,’ या संजय काका पाटील यांच्या विधानाने खळबळ माजली आहे.
भाजपव्यतिरिक्त अन्य पक्षांच्या राजकारण्यांमागे ईडी, आयटीचा ससेमिरा लागला असतानाच हर्षवर्धन पाटील आणि त्यांच्यापाठोपाठ आता संजय काका पाटील यांनी केलेल्या विधानांमुळे राजकीय वर्तुळातून उलटसुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. सांगलीत झालेल्या एका कार्यक्रमात भाजप खासदार संजय काका पाटील यांना निमंत्रित करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात स्टेजवरून बोलताना संजय काका पाटील यांनी आर्थिक बाबींवर बोलताना ईडीच्या कारवाईवर विधान केले. ‘माझ्यामागे ईडी लागणार नाही. मी भाजपाचा खासदार आहे. त्यामुळे ईडी इकडे येणार नाही. आमचे कर्जाचे आकडे तुम्ही जर बघितलेत तर गमती गमतीत हर्षवर्धन पाटील म्हणाले होते की भाजपामध्ये आल्यापासून झोप चांगली लागते. तसं ईडीनं आमची कर्ज बघितली, तर म्हणतील ही माणसं आहेत का काय आहेत’, असे ते म्हणाले.






























































