
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागल्यानंतर हळूहळू सर्व गोष्टी अनलॉक होत आहेत. तब्बल दीड वर्षाच्या विश्रांतीनंतर एनसीपीएची दारं 29 ऑक्टोबरपासून पुन्हा प्रेक्षकांसाठी खुली होणार आहेत. यानिमित्ताने नाटक, पाश्चात्य आणि हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत, शास्त्रीय नृत्य आणि आंतरराष्ट्रीय संगीत अशा भरगच्च कार्यक्रमांची मेजवानीचा रसिकांना मिळणार आहे.
29 ऑक्टोबरला सायंकाळी 7 वाजता प्रशांत दामले, कविता लाड-मेढेकर यांच्या ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकाचा प्रयोग होणार आहे. 30 ऑक्टोबरला संगीतकार लुई बँक्स आणि त्यांचे अनुभवी कलाकार जॅझ प्रेमींसाठी ‘ब्लास्ट फ्रॉम द पास्ट’ कार्यक्रम सादर करतील. 31 ऑक्टोबरला संगीत दिग्दर्शक मराट बिसेंगालीव यांच्या नेतृत्वाखाली ‘एसओआय चेंबर ऑर्केस्ट्रा’ सादर होईल. 12 नोव्हेंबरला ‘राशिद खान इन कॉन्सर्ट’ होणार आहे. तर 13 नोव्हेंबरला शास्त्रीय नृत्यांगना रमा वैद्यनाथन आणि मल्लिका साराभाई या अनुक्रमे ‘प्रतिबोधना-द अवेकनिंग’ आणि ‘जेम्स ऑफ कुचीपुडी’ या त्यांच्या विशेष परफॉर्मन्ससह स्टेजवर परततील.
























































