पुन्हा रंगमंच उजळला; आनंद वाटला! – हृदयनाथ मंगेशकर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयुष्याच्या दीर्घ प्रवासात माझ्याबरोबरचे गायक राहिले नाहीत, एकही वादक राहिला नाही. सर्व सवंगडी मला सोडून चालले आहेत. याचे दुःख आहेच. दुसरीकडे आनंदाची गोष्ट म्हणजे मला वाटलं नव्हतं की माझ्या आयुष्यातील लॉकडाऊन उठेल आणि माझा आज असा कार्यक्रम होईल. सर्व कलाकार परत भेटतील! खरंच रंगमंच पुन्हा उजळला आणि सगळं छान झालं, अशा शब्दांत  ‘भावगंधर्व’ पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचे 85 व्या वर्षातील पदार्पणानिमित्त ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना ‘हृदयनाथ’ पुरस्काराने आज सन्मानित करण्यात आले.  विलेपार्ले येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाटय़गृहात हा पुरस्कार सोहळा रंगला. एक लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पंढरीच्या विठुरायाने परिधान केलेले वस्त्र देऊन मंगेशकर कुटुंबीयांनी हृदयनाथ मंगेशकर यांचे अभीष्टचिंतन केले.

हृदयेश आर्ट्सचा 32 वा वर्धापन दिन,  हृदयनाथ मंगेशकर यांचा वाढदिवस आणि कवयित्री शांता शेळके यांचे जन्मशताब्दी वर्ष याचे औचित्य साधून हा कार्यक्रम झाला. ‘मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश’ हा कार्यक्रम यावेळी झाला. विभावरी आपटे, मधुरा दातार, जितेंद्र अभ्यंकर, प्राची देवल यांनी गाणी सादर केली. कार्यक्रमाचे निवेदन स्मिता गवाणकर यांनी केले. यावेळी ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर, सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर, मुंबई दूरदर्शनचे अतिरिक्त महासंचालक नीरज अग्रवाल, आमदार पराग अळवणी, हृदयेश आर्ट्सचे अविनाश प्रभावळकर, आदिनाथ मंगेशकर, बैजनाथ मंगेशकर, आर्च एंटरप्रायझेसचे विनीत गोरे आदी उपस्थित होते. ‘चांदण्याचा झोत’ हे हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीत दिलेले गाणे यावेळी लाँच झाले. बैजू मंगेशकर यांनी हे गीत गायले आहे.

हृदयनाथ मंगेशकर यांच्या गाण्यावर जगलोय – सुरेश वाडकर

पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचा नावाचा एवढा मोठा  पुरस्कार मिळतोय. जणू आज मला परमेश्वराने खजिना दिलाय. हृदयनाथ मंगेशकर यांच्या गाण्यावर मी जगलोय, अशा भावना सुरेश वाडकर यांनी पुरस्कार स्वीकारल्यावर व्यक्त केल्या. तसेच खूप दिवस झालेत मंगेशकर यांच्याकडून गाणे मिळाले नसल्याची खंत वाडकर यांनी व्यक्त केली.