
सांगली जिल्ह्यातील भाजपमधील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा उफाळून आली. जिल्हा परिषद पदाधिकारी बदलावर शिक्कामोर्तब झाल्यानंतरही केवळ खासदार संजय पाटील गटाच्या समाजकल्याण सभापती प्रमोद शेंडगे यांनी कोअर कमिटीकडे राजीनामा सादर केला. मात्र, उपाध्यक्ष आणि इतर तीन सभापतींनी राजीनामा देण्यास नकार दिला. त्यामुळे भाजपच्या कोअर कमिटी आणि नेत्यांसमोर पेच निर्माण झाला आहे.
सांगली जिल्हा बँकेच्या थकीत कर्ज प्रकरणावरून भाजपाचे खासदार संजय पाटील आणि जिल्हाध्यक्ष, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्यात दरी निर्माण झाली आहे. त्यामुळे भाजपमध्ये दोन गट निर्माण झाले आहेत. जिल्हा परिषदेचे पदाधिकारी बदलावर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि भाजप कोअर कमिटीने निर्णय घेतला. पदाधिकाऱयांनी सोमवारी आणि मंगळवारी कोअर कमिटीकडे राजीनामे सादर करावेत, असा निर्णय झाला.
मात्र, सोमवारी केवळ खासदार संजय पाटील गटाचे समाजकल्याण सभापती प्रमोद शेंडगे यांनी राजीनामा सादर केला, तर उर्वरित उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे, सभापती सुनीता पवार, जगन्नाथ माळी आणि आशा पाटील यांनी राजीनामा देण्यास नकार दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे पदाधिकारी बदलाच्या निर्णयाला ‘खो’ बसणार की काय? अशी चर्चा सुरू आहे.




























































