सामना अग्रलेख – संकट दारात आहे!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिवाळीमुळे बाजारपेठा गजबजल्या आहेत, रस्ते गर्दीने फुलून गेले आहेत. लॉक डाऊन उठविताना प्रशासनाने जे नियम घालून दिले, त्याचे उल्लंघन करून मास्कचा वापर न करता लोक बिनदिक्कतपणे गर्दीत मिसळत आहेत. कोरोनाच्या तिसऱया लाटेने रशियासारख्या देशात पुन्हा हाहाकार उडविला आहे. कोरोनाच्या ज्या नव्या व्हेरिएंटने अमेरिका, ब्रिटन व रशियात मृत्यूचे थैमान सुरू झाले, तोच घातक विषाणू आपल्याकडेही सहा राज्यांत आढळला असेल तर याचा अर्थ स्पष्ट आहे, कोरोनाच्या तिसऱया लाटेचे संकट उंबरठ्यावर उभे आहे. नियमांची ऐशीतैशी करून बेदरकारपणे गर्दी करणाऱयांनी हे समजायला हवे!

कोरोनाच्या पहिल्या दोन लाटांनी देशभरात हाहाकार उडवल्यानंतर गेल्या महिना दोन महिन्यांत कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाटय़ाने कमी झाली. त्यामुळे तिसऱया लाटेचा धोका आता टळला आहे असेच एकंदरीत चित्र निर्माण झाले होते. तथापि, हा विषाणू आणि त्याच्या संक्रमणाविषयी येणाऱया ताज्या बातम्या पाहता हा धोका पूर्णपणे टळला, असे म्हणणे धाडसाचे ठरेल. कोरोनाच्या रुग्णसंख्येचा आलेख कमी होताना दिसत असला, तरी कोरोनामुळे होणाऱया मृत्यूंचे आकडे धडकी भरविणारे आहेत. गुरुवारी तर देशभरात चोवीस तासांत 805 कोविडबाधितांचा मृत्यू झाला. त्याच्या एक दिवसआधी म्हणजे बुधवारी 733 जण कोरोनामुळे मृत्युमुखी पडले. आजही आपल्या देशात दररोज सुमारे 15 हजार रुग्णांची नव्याने नोंद होत आहे. शिवाय 24 तासांत 800 हून अधिक बळी जात असतील तर मृत्युमुखी पडणाऱयांचे हे प्रमाण नक्कीच चिंता वाढविणारे आहे. त्यातच कोरोनाचा नवा व्हेरिएंटही वेगाने पसरतो आहे. रशिया, युक्रेन आदी देशांमध्ये कोरोनाच्या तिसऱया लाटेने भयंकर थैमान घातले आहे. रशियात तर दररोज 1 हजाराहून अधिक लोक मृत्युमुखी पडत आहेत. वाढती मृत्युसंख्या आणि नव्या व्हेरिएंटने घातलेला धुमाकूळ पाहता आपल्याकडेही

तिसऱया लाटेची टांगती तलवार

अजून कायम आहे. केंद्रीय सरकार, राज्य सरकारे, प्रशासन, आरोग्य यंत्रणा यांनीच केवळ हा धोका ओळखून चालणार नाही. देशातील जनतेनेही दारावर धडका मारणारे तिसऱया लाटेचे हे संकट ओळखणे तितकेच आवश्यक आहे. कोरोनाच्या 4.2 या नव्या व्हेरिएंटचे संक्रमण अमेरिका, रशिया, ब्रिटन, चीन वगैरे देशांमध्ये झपाटय़ाने होत आहे. रशियात तर अनेक शहरांमध्ये आठवडाभराचा लॉक डाऊन जाहीर करण्यात आला आहे. ब्रिटनमध्येदेखील कोरोनाच्या डेल्टा प्लस या घातक विषाणूचे संक्रमण झालेले 50 हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. पूर्वीपेक्षाही अधिक धोकादायक असलेल्या या विषाणूमुळेच रशिया व अन्य देशांत कोरोनाची तिसरी लाट दिवसेंदिवस उग्र रूप धारण करते आहे. हिंदुस्थानातही या विषाणूने आपले हातपाय पसरणे सुरू केले आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ, जम्मू-कश्मीर आणि तेलंगणा या सहा राज्यांमध्ये आता हा नवा व्हेरिएंट सापडला आहे. गेल्या काही दिवसांत वाढणारी रुग्णसंख्या आणि सातत्याने वाढणारा मृतांचा आकडा प्रशासनाची चिंता वाढविणारा आहे. तिसऱया लाटेची आस्तेकदम सुरू असलेली

ही चाहुल ओळखण्यात

आपण कमी पडलो तर देशात पुन्हा एकदा भयंकर परिस्थिती ओढवू शकते. कोरोना आता संपलाच आहे, असा देशातील बहुतांश जनतेचा ग्रह झाला आहे. लस घेतल्यामुळे आता आपल्याला काही होणार नाही, हा विश्वासही अवाजवी ठरू शकतो. सारेकाही आलबेल झाले आहे, अशा थाटात जनतेचा मुक्त संचार सुरू आहे. नवरात्र, दसरा आदी सणाला देशाच्या कानाकोपऱयातून गर्दीची जी दृश्ये समोर आली, ती कोरोनाला आमंत्रण देणारीच होती. आताही दिवाळीमुळे बाजारपेठा गजबजल्या आहेत, रस्ते गर्दीने फुलून गेले आहेत. लॉक डाऊन उठविताना प्रशासनाने जे नियम घालून दिले, त्याचे उल्लंघन करून मास्कचा वापर न करता लोक बिनदिक्कतपणे गर्दीत मिसळत आहेत. कोरोनाच्या तिसऱया लाटेने रशियासारख्या देशात पुन्हा हाहाकार उडविला आहे. कोरोनाच्या ज्या नव्या व्हेरिएंटने अमेरिका, ब्रिटन व रशियात मृत्यूचे थैमान सुरू झाले, तोच घातक विषाणू आपल्याकडेही सहा राज्यांत आढळला असेल तर याचा अर्थ स्पष्ट आहे, कोरोनाच्या तिसऱया लाटेचे संकट उंबरठय़ावर उभे आहे. नियमांची ऐशीतैशी करून बेदरकारपणे गर्दी करणाऱयांनी हे समजायला हवे!