
सर्दी, खोकल्यापासून ते मधुमेह, कॅन्सर अशा गंभीर रोगांची लक्षणे ओळखून तुम्हाला वेळीच सावध करणारा टूथब्रश तुम्हाला मिळाला तर? अद्भूत वाटणारी ही कल्पना लवकरच प्रत्यक्षात उतरणार आहे. ‘डायग्नोस्टिक टूथब्रश’ सारखी अनेक ‘स्मार्ट उपकरणे’ लवकरच तुमच्या आमच्या आयुष्यात दाखल होणार आहेत. विशेष म्हणजे गंधावरून आजाराची लक्षणे ओळखण्याची कामगिरी ही स्मार्ट उपकरणे पार पाडणार आहेत. सकाळी सकाळी तुम्ही हातात टूथब्रश घेऊन दाताला लावलात की, हा स्मार्ट ब्रश त्याच्या कामाला सुरुवात करेल आणि त्याच्यात बसवण्यात आलेले गंधाचे सेन्सर तुमच्या आरोग्याची माहिती गोळा करून तुमच्यापर्यंत पोचवतील.
हे सगळे कसे शक्य होणार आहे? तर फ्रान्समधील तंत्रज्ञान क्षेत्रात अग्रेसर असणारी कंपनी ‘अरिबाल’ सध्या गंधांचे अर्थात विविध वासांचे विश्लेषण करण्यात मग्न आहे. यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI)ची मदत घेतली जात आहे. कोणत्या प्रकारच्या गंधांचा आपल्या आयुष्यावर आणि आरोग्यावर काय परिणाम होतो याचा अभ्यास करण्याचे काम सध्या पंपनीतर्फे सुरू आहे. प्रकाश किंवा ध्वनीला तरंगांच्या मदतीने मोजणे, त्यांचा अभ्यास करणे सोपे आहे, पण गंधाच्या बाबतीत हे काम अतिशय कठीण असे आहे. ‘अरिबाल’ पंपनी त्यासाठी सिलिकॉनच्या चिपवर बसवलेल्या प्रोटीनच्या तुकडय़ांचा वापर विविध अणूंचा गंध समजून घेण्यासाठी करत आहे.
या गंधांच्या अधिक अभ्यासाने त्यांच्या माध्यमातून अनेक आजारांच्या लक्षणांची माहिती वेळीच मिळू शकणार आहे. गंधाच्या मदतीने आजाराची लक्षणे समजू शकतात हे मानवाला फार पूर्वीपासून माहिती आहे. आता याच कलेला अभ्यासाची जोड देण्यात येत आहे. गेल्या वर्षी फिनलॅण्डची राजधानी असलेल्या हेलसिंकीच्या विमानतळावर ‘कोरोनाग्रस्त’ प्रवाशांची ओळख पटवण्यासाठी प्रशिक्षित अशा श्वानांची नेमणूक करण्यात आली होती. विमानतळावरच्या प्रचंड गर्दीतदेखील केवळ वासावरून ‘कोरोनाग्रस्त’ प्रवासी ओळखण्याची कामगिरी या हुशार श्वानांनी पार पाडली होती. याच धर्तीवर आता गंधाच्या मदतीने आजाराची लक्षणे ओळखणारी स्मार्ट उपकरणे तयार केली जात आहेत.




























































