टीम इंडियाचा पुन्हा फ्लॉप शो; न्यूझीलंडकडूनही लाजिरवाणा पराभव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टी 20 विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या सलामीच्या पराभवाने खचून गेलेला हिंदुस्थानी क्रिकेट संघ अद्याप त्या धक्क्यातून सावरलेला नाही. आज दुबईच्या दुसऱया लढतीतही पार अपयशी ठरला. टीम इंडियाचा दुर्दैवी कर्णधार पुन्हा नाणेफेक हरला आणि तिथेच हिंदुस्थानी क्रिकेटशौकिनांच्या मनात शंकेची पाल चुकचुकू लागली होती. न्यूझीलंडच्या प्रभावी वेगवान माऱयापुढे टीम इंडियाच्या फलंदाजांची पार भंबेरी उडाली. नवखा अफगाणिस्तान मैदानात मोठय़ा संघांना स्तुत्य लढत देत असताना बलाढय़ गणला जाणारा हिंदुस्थान मात्र दुसऱया सामन्यातही अपयशाच्या गर्तेत सापडलेला दिसला. न्यूझीलंड संघ विजयाच्या जिद्दीने खेळत असताना हिंदुस्थानी फलंदाज मात्र धावांशी चाचपडताना दिसले. किवीजने अखेर टीम इंडियाला 20 षटकांत केवळ 7 बाद 110  धावांवर रोखले आणि विजयासाठीचे 111 धावांचे छोटे आव्हान 8 विकेट आणि 33 चेंडू राखून पार केले.

हिंदुस्थानने विजयासाठी समोर ठेवलेले 111 धावांचे आव्हान न्यूझीलंडने 14.3 षटकांत केवळ 2 फलंदाजांच्या विकेट गमावून पार केले.डेरील मिचेल (35 चेंडूंत 49) आणि कर्णधार केन विलियमसन (31 चेंडूंत नाबाद 33) यांनी संघाला सहज सोपा विजय मिळवून दिला.आजच्या सलग दुसऱया पराभवाने टीम इंडियाच्या उपांत्यफेरी प्रवेशाच्या आशा धुसर झाल्या आहेत. आता एखादा चमत्कारच हिंदुस्थानचे स्पर्धेतील आव्हान टिकवू शकणार आहे.

बोल्ट, सोधीने उखडला हिंदुस्थानी डाव

 नाणेफेक हरल्यावर  फलंदाजीसाठी मैदानात उतरलेला हिंदुस्थानी संघ आज माजी विजेत्यांसारखा मुळीच भासला नाही.न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजांनी हिंदुस्थानी डावाला भगदाड पाडल्यानंतर किवींचा फिरकीवीर यश सोधीनेही आपला प्रभाव दाखवत रोहित शर्मा (14 ) आणि कर्णधार विराट कोहली (9) या प्राईझ विकेट मिळवल्या. एरव्ही फिरकी गोलंदाजीवर हुकूमत गाजवणारे हिंदुस्थानचे स्टार फलंदाज आज सोढीच्या फिरकीपुढेही हतप्रभ झालेले दिसले. किवींचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने 20 धावांत 3 तर फिरकीवीर ईश सोधीने 17 धावांत 2 हिंदुस्थानी फलंदाजांना बाद करीत टीम इंडियाचा डाव 20 षटकांत 7 बाद 110 या छोटय़ा धावसंख्येवर रोखला.