
संभाजीनगर जालना लोकसभा मतदारसंघाचे दोन वेळा खासदार राहिलेले पुंडलिक हरी दानवे (वय – 95) यांचे सोमवारी सकाळी संभाजीनगरातील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. मंगळवार 2 नोव्हेंबर रोजी त्यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळगावी पिंपळगाव सुतार तालुका भोकरदन येथे दुपारी 12.30 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
गेले एक महिन्यापासून त्यांच्यावर संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. पुंडलिकराव दानवे यांना रुग्णालयात दाखल केल्याचे समजल्यानंतर त्यांच्या पत्नी केशरबाई दानवे (वय – 86) यांचे गत गुरुवारी 28 ऑक्टोंबर रोजी निधन झाले होते व 29 ऑक्टोंबर रोजी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पत्नीच्या निधनानंतर अवघ्या चारच दिवसात पुंडलिकराव दानवे यांचेही निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांचे पुत्र राष्ट्रवादी काँग्रेस भोकरदनचे माजी आमदार चंद्रकांत दानवे, पिंपळगाव सुतार येथील माजी सरपंच बबनराव दानवे सुधाकर दानवे, तसेच कन्या जिजाबाई जाधव, जावई, सुना, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे.
पुंडलिक हरी दानवे सर्वत्र पीएचडी या टोपण नावाने प्रसिद्ध होते. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगणारे पुंडलिकराव दानवे यांची जडणघडण राष्ट्रीय स्वयंसेवक संघात झाली. आपल्या राजकीय जीवनाला भारतीय जनसंघाच्या माध्यमातून सुरुवात केली 1967 झाली ग्रुप ग्रामपंचायत असलेल्या पिंपळगाव सुतार (ता. भोकरदन)चे त्यांनी पंधरा वर्ष सरपंचपद भूषविले. नंतर पंचायत समिती भोकरदनच्या निवडणुकीतही त्यांनी विजय संपादन केला. जालना जिल्हा औरंगाबाद मध्ये असताना त्यांनी काँग्रेसचे बाबुराव काळे यांच्या विरोधात विधानसभेची निवडणूक लढवली. पाच वेळा जालना लोकसभा मतदार संघातून त्यांनी भारतीय जनसंघ व नंतर भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर निवडणूक लढवली त्यात त्यांना दोन वेळा यश आले. 1977 जनता लाटेमध्ये ते खासदार झाले होते त्यानंतर 1989 मध्ये अल्प काळ राहिलेल्या लोकसभेचे सदस्यत्व भूषविण्याचा मानही त्यांना मिळाला होता.
1989 ची लोकसभा बरखास्त झाल्यानंतर त्यांनी खासदारांना मिळत असलेला रेल्वे सवलतीचा पास जमा करून दिल्ली ते संभाजीनगर असा सर्वसाधारण दर्जाच्या डब्यातून प्रवास केला होता. बस आणि रिक्षाने प्रवास करणारा खासदार म्हणून त्यांची सर्वत्र ख्याती होती. राजकारणात खासदारकीच्या पदावर राहूनही त्यांची साधेपणाची वर्तवणूक कायम होती. भारतीय जनसंघाचे तत्कालीन नेते अटलबिहारी वाजपेयी लालकृष्ण अडवाणी नानाजी देशमुख, कुशाभाऊ ठाकरे सुंदरसिंह भंडारी दत्तोपंत ठेंगडी, जगन्नाथ जोशी, यादवराव जोशी आदीं समवेत त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते त्यांच्यासोबत पक्षकार्य करण्याची संधी त्यांना मिळाली होती.


























































