आर्यनकडे ड्रग्ज सापडलेच नाही; सॅम डिसोझा आला समोर, शाहरूखकडून 50 लाख घेतल्याची कबुली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कॉर्डेलिया क्रूझ पार्टी प्रकरणाचे एकेक पैलू आता उघड होत आहेत. पंच साक्षीदार प्रभाकर साईल याने प्रतिज्ञापत्र देऊन खंडणीसाठी हा बनाव रचल्याचा आरोप केला होता. त्यात त्याने सॅम डिसोझा नावाच्या व्यक्तीचाही उल्लेख केला होता. तोच सॅम डिसोझा आज प्रसारमाध्यमांसमोर आला. आर्यनकडे ड्रग्ज सापडलेच नाही अशी धक्कादायक माहिती त्याने दिली. त्याचप्रमाणे या प्रकरणात शाहरूख खानकडून 50 लाख रुपये घेतल्याची कबुलीही देऊन त्याने खळबळ उडवली आहे.

आर्यन खानला हाताला धरून एनसीबीच्या कार्यालयात आणणारा किरण गोसावी याला पुणे पोलिसांनी एका फसवणुकीच्या प्रकरणात नुकतीच अटक केली. तो गोसावी फ्रॉड असल्याचे डिसोझाने म्हटले आहे. सुनील पाटील नावाच्या व्यक्तीने मला फोन करून क्रूझ पार्टीबाबत एनसीबीला फोन कर असे सांगितले होते असे डिसोझाचे म्हणणे आहे. आर्यन खान याच्याकडे ड्रग्ज सापडलेले नाही, तो निर्देष आहे असे मला गोसावीने सांगितले होते. गोसावीनेच आर्यनला शाहरुखला फोन करण्यास सांगितले आणि ते बोलणे रेका@र्ड केले होते असा दावाही डिसोझाने केला आहे.

सुनील पाटीलचे पॉलिटिकल कनेक्शन

सुनील पाटील हा या प्रकरणात मध्यस्थ होता. तो मूळचा धुळ्याचा आहे. दिल्ली आणि गुजरातमध्ये त्याचे सतत येणे-जाणे असते. क्रूझ पार्टीची माहिती पाटील याच्याकडूनच मला मिळाली होती. त्याचे राजकारणी लोकांशी कनेक्शन आहे असे डिसोझाने म्हटले आहे. एनसीबीचे अधिकारी विश्वविजय सिंग यांच्या नावाचाही डिसोझाने उल्लेख केला. लवकरच आपणही प्रतिज्ञापत्र सादर करून तपासात सहकार्य करणार असल्याचे त्याने म्हटले आहे.