
मुंबईच्या निरनिराळय़ा हेरिटेज वास्तू आणि सायंकाळी विविध रंगांनी नटलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, महापालिका इमारत तसेच चर्चगेट मुख्यालयाची रोषणाई आता बेस्टच्या खुल्या छताच्या दुमजली बसमधून न्याहाळता येणार आहेत. बुधवारी या ओपन डेक बसचे उद्घाटन झाले असून अपर डेकसाठी प्रति व्यक्ती 150 रुपये तर लोअर डेककरीता प्रति व्यक्ती 75 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहेत.
मुंबई अनेक हेरिटेज वास्तू असून पर्यटक या वास्तू पहाण्यासाठी उत्सुक आहेत.या पर्यटकांना मुंबईतील वास्तूंचे दर्शन घेता यावे यासाठी बेस्ट उपक्रमाने ‘ओपन डेक बस सेवा’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही बस सेवा गेट वे ऑफ इंडिया येथून सुरू होणार असून प्रिन्स वेल्स ऑफ म्युझियम, मंत्रालय, विधानभवन, एनसीपीए, मरीन ड्राईव्ह, चौपाटी, चर्चगेट स्टेशन, ओव्हल मैदान, राजाबाई टॉवर ( मुंबई उच्च न्यायालय, मुंबई विद्यापीठ) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई महापालिका मुख्यालय, हुतात्मा चौक, हॉर्निमन सर्कल, रिझर्व बँक ऑफ इंडिया, एशियाटिक लायब्ररी व ओल्ड कस्टम हाऊस.
बस गाडय़ांच्या वेळा – गेट वे ऑफ इंडिया येथून – सायंकाळी 6.30 ते 7.45 आणि 8 आणि 9.15 वाजता
या पर्यटन बसचे तिकीट छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक व गेट वे ऑफ इंडिया या ठिकाणी मिळेल. माहितीसाठी टोल फ्री क्र.1800227550/ 022-24190117 याप्रमाणे आहे.
हेरिटेज पर्यटन सेवेचा लोकार्पण सोहळा
बेस्ट उपक्रमाच्या हेरिटेज वारसा पर्यटन सेवेचा लोकार्पण सोहळा बेस्ट समिती अध्यक्ष आशीष चेंबूरकर यांच्या हस्ते गेटवे ऑफ इंडिया येथे संपन्न झाला. याप्रसंगी बेस्ट समिती सदस्य अनिल पाटणकर, सुनील अहिर, बबन कनावजे आणि बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र तसेच बेस्टचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. खुल्या दुमजली बसगाडीद्वारे पर्यटकांना आता मुंबईची सफर करता येणार आहे.






























































