साय-फाय – सोशल दहशतवाद कसा रोखणार?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रसाद ताम्हनकर

सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक समाजविघातक घटक आपले काम जोमाने करत असल्याची चिंता जगभरातील सुरक्षा यंत्रणा व्यक्त करत आहेत. त्यातल्या त्यात फेसबुकसारख्या सर्वव्यापी सोशल व्यासपीठावरून अशा घातक कार्याला मोठय़ा प्रमाणात चालना दिली जात असल्याचा आरोप जगभरात होत असतो. काही प्रगत देशांमध्ये फेसबुकला यासाठी कायद्याच्या लढाईलादेखील सामोरे जावे लागत आहे. हिंदुस्थानातदेखील फेसबुकच्या माध्यमातून दंगली, जातीय द्वेष, हिंसा यांना प्रोत्साहन दिले गेल्याचे अनेकदा समोर आलेले आहे. आता फेसबुक या सगळ्या गुह्यांसाठी कसा जबाबदार आहे याचा भक्कम पुरावा फेसबुकच्याच एका माजी कर्मचाऱयाने समोर आणला आहे. त्यातही प्रामुख्याने हिंदुस्थानात असा सोशल दहशतवाद पसरवण्यात फेसबुकचा किती मोठा सहभाग आहे हेदेखील समोर येत आहे आणि त्यामुळे जगभरातील वर्तमानपत्रात हा विषय जोरदार चर्चेत आलेला आहे.

या वर्षाच्या सुरुवातीला साधारण 289 करोड लोक जगभरात फेसबुकचा वापर करत असल्याचे एका अहवालात समोर आले आहे. मात्र या लोकांच्या लेखनावर, त्यांच्या फेसबुकवरील एकूण वावरावर लक्ष ठेवण्यासाठी केवळ 15 हजार मॉडरेटर्स फेसबुकतर्फे नेमल्याचे समोर आले आहे. याचा अर्थ, 1.93 लाख फेसबुक वापरकर्त्यांवर लक्ष ठेवण्यासाठी फक्त एक ‘मॉडरेटर’ उपलब्ध आहे. हिंदुस्थानात आणि जगभरात या मॉडरेटर्सबरोबर आर्टिफिशल इंटेलिजन्स अथवा ज्यांना निगराणी करणारे रोबोट म्हणता येईल, अशा यंत्रांच्या माध्यमातूनदेखील फेसबुक वापरकर्त्यांवर लक्ष ठेवण्यात येते. हिंदुस्थानात अंदाजे एकूण 22 मान्यताप्राप्त भाषांमधून फेसबुकवर लिखाण होते, मात्र या भाषांपैकी केवळ 5 भाषा हे फेसबुक रोबोट अथवा अल्गोरिदम समजू शकत असल्याचेदेखील उघड झाले आहे.

हिंदुस्थानात फेसबुकच्या माध्यमातून अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. धार्मिक आणि जातीय विद्वेष पसरवला जात आहे. नेते-अभिनेते आणि अनेक प्रसिद्ध व्यक्तींच्या खासगी आयुष्याबद्दल बदनामीकारक मजकूर सर्रास पसरवला जात आहे, असे खुद्द फेसबुकनेच केलेल्या एका निरीक्षणामधून स्पष्ट झाले आहे. मात्र या गंभीर रिपोर्टनंतरदेखील फेसबुकने त्याच्याकडे काणाडोळा करत, जणू काही या सर्व गुह्यांना प्रोत्साहन देण्याचेच काम एक प्रकारे सुरू ठेवले आहे. हे सर्व थांबवण्यासाठी तंत्रज्ञ तसेच सुरक्षा कर्मचाऱयांची मोठय़ा प्रमाणावर भरती करणे गरजेचे आहे. मात्र लोकांचे जीव, घातपात आणि दंगली यापेक्षा फेसबुकला आपल्या पैशाची बचत जास्ती महत्त्वाची वाटते आणि त्यासाठी फेसबुक अधिक कर्मचारी वाढवण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोपदेखील या माजी फेसबुक कर्मचाऱयाने केला आहे. मुख्य म्हणजे, फेसबुकच्या माध्यमातून हिंदुस्थानात पसरत असलेल्या सोशल दहशतवादाचा जो रिपोर्ट समोर आला आहे, तो बनवण्यातही माजी कर्मचारीदेखील सहभागी होती. त्यामुळे तिने समोर आणलेल्या या माहितीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
2019 साली हिंदुस्थानात झालेल्या निवडणुकांनंतरदेखील फेसबुकचा खोटेपणा प्रामुख्याने समोर आला होता. निवडणूक काळात फेसबुकद्वारे अनेक खोटय़ा बातम्या पसरवणे, नेत्यांची वैयक्तिक बदनामी करणे जाणूनबुजून घडवण्यात आल्याचे फेसबुकच्याच एका रिपोर्टद्वारे समोर आले होते. असे चुकीचे प्रकार करणाऱया लोकांकडे फेसबुकने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचेदेखील फेसबुकच्या अंतर्गत तपासणीत उघड झाले आहे. मात्र फेसबुकने हे सर्व प्रकरण दुर्लक्षित तर केलेच, पण उघड होण्यापासूनदेखील वाचवले आहे. कोरोना काळातदेखील लोकांमध्ये विनाकारण भीती पसरवणे, अवैद्यकीय उपायांची जाहिरात करणे अशा कामासाठी फेसबुकचा वापर झाल्याचा आरोप प्रामुख्याने समोर येत आहे.
z [email protected]