
राज्यातील अनेक भाविकांचे कुलदैवत व श्रद्धास्थान असलेल्या येथील श्री सिद्धनाथ देवी जोगेश्वरी देवस्थानचा पारंपरिक शाही विवाह सोहळ्याचा शुभारंभ दीपावली पाडव्याच्या मुहुर्तावर (दि. 5) घटस्थापनेने करण्यात आला. मंदिराचे सालकरी कृष्णात गुरव यांनी सपत्नीक श्रींच्या मंदिरात घटस्थापना केली.
सकाळी अकरा वाजता श्री सिद्धनाथ व देवी जोगेश्वरी देवस्थानच्या उत्सवमूर्तीस हळदी लावण्याचा कार्यक्रम हत्ती शिल्प मंडपात महिलांच्या उपस्थित संपन्न झाला. श्रींच्या शाही मंगल विवाह सोहळ्यानिमित्त मंदिर शिखर व परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.
शाही विवाह सोहळय़ानिमित्त भाऊबीजेदिवशी नवरदेव श्री सिद्धनाथ व वधू देवी जोगेश्वरी यांच्या मूर्तींची मिरवणुकीने सायंकाळी पालखी राजबागेतील पुरातन म्हातारबाबा मंदिरास आणण्यात आली. यावेळी सालकरी, पुजारी, मानकरी यांचा मिरवणुकीने भेटीचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
कार्तिक प्रतिपदा ते मार्गशीर्ष महिन्यातील प्रतिपदा दरम्यानच्या एक महिन्याच्या कालावधीचा श्रींचा हा मंगलमय सोहळा विविध धार्मिक उपक्रमांनी संपन्न होत असतो. श्रींच्या शाही विवाह सोहळ्यानिमित्त श्रींच्या मूर्तीस हळदी लावण्याचा कार्यक्रम आज दुपारी संपन्न होताच पारंपरिक पद्धतीने बारा दिवसांच्या रात्री सलग बारा दिवस उपवास समवेतच संपूर्ण नगरप्रदक्षिणा परिक्रमा उपक्रम पुजारी, मानकरी व भाविकांनी प्रारंभ केला.
तुलसी विवाहादिवशी (दि. 15) पहाटे पाच वाजता श्रींचे घट उठविणे व रात्री श्रींचा विवाह सोहळा संपन्न होणार आहे. या विवाह सोहळ्यानंतर (दि. 27 ) काळभैरव अष्टमी रात्री नऊ वाजता आयोजित करण्यात आला आहे. विवाह सोहळ्याची सांगता देवदिवाळीस (दि. 5 डिसेंबर) वधू-वराची रथातून वरात काढून करण्याची परंपरा आहे. गेल्या वर्षी हा सोहळा कोरोनामुळे रद्द करण्यात आला होता. यंदाही शासनाचे यात्रा बंदी निर्बंध लागू असल्यामुळे परिस्थिती पाहून निर्णय होण्याची शक्यता आहे.






























































