
हिंदुस्थानात पहिल्यांदाच दुर्मिळ ‘गुलाबी’ बिबट्या दिसला आहे. हा बिबट्या दक्षिण राजस्थानच्या अरवली पर्वतरांगांमध्ये रणकपूर भागात दिसला आहे. क्लॉड डिसोझा यांच्या रिपोर्टनुसार, यापूर्वी 2012 आणि 2019 मध्ये दक्षिण आफ्रिकेत गुलाबी बिबट्याचे दर्शन घडले होते. तसेच पांढऱ्या रंगाचा बिबट्या 1910 मध्ये हिंदुस्थानात दिसला होता. त्यानंतर आतापर्यंत हिंदुस्थानात फक्त सामान्य आणि काळा बिबट्या दिसत आहे. अशातच हा गुलाबी बिबट्या दिसणे ही अत्यंत दुर्मिळ घटना आहे.
रणकपूर आणि कुंभलगढमधील स्थानिकांनी दावा केला आहे की, त्यांनी त्यांच्या भागात अनेकदा आकाराने मोठी असलेली एक मांजर पाहिली होती, त्यानंतर आता गुलाबी बिबट्या कॅमेरात कैद झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनुवांशिक फरकामुळे बिबट्याचा रंग गुलाबी होतो, मात्र हे फार दुर्मिळ आहे.
उदयपूरचे वन्यजीव संरक्षक आणि छायाचित्रकार हितेश मोटवानी यांनी या दुर्मिळ बिबट्याची छायाचित्रे आपल्या कॅमेऱ्यात कैद केल्याचा दावा केला आहे. हिंदुस्थानात पिंक पँथरचे दर्शन पर्यटनाच्या दृष्टिकोनातूनही खूप महत्त्वाचे असल्याचे बोलले जात आहे.



























































