ज्ञानगंध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रज्ञा पळसुले

तिमिरापासून तेजोमय प्रकाशाकडे जाणारा अनंत मार्गी वाटेवरील प्रवास व त्या प्रवासातील टक्क्याटोणक्यातून शहाणपण शिकून आपल्यात आलेली परिपक्वता म्हणजेच ज्ञानाचा झालेला उगम आणि आपला स्वतःचा नव्याने आपल्याच अंतरआत्म्याशी झालेला खरा परिचय म्हणजे जगण्यासाठी मिळालेला अर्थ. या सगळ्यातून प्रगल्भ झालेले व्यक्तिमत्त्व आणि सकारात्मकता याचाही एखादा ‘सुगंध’ असू शकतो याचा आज मी नव्याने प्रत्यय घेतला. माझ्यासाठी तो अत्यंत सुखद अनुभव होता…

पूर्वी शाळेत जाताना नव्याकोऱया पुस्तकांचा व वह्यांचा सुगंध खूप आवडायचा, पाटीवरील पेन्सीलचा वास तर मी अगदी मन तृप्त होईस्तोवर भरभरून घेत असे… यामागे नवीन वस्तूंचे आकर्षण तर असायचेच पण या सगळ्या वस्तू म्हणजे कुठे ना कुठे ज्ञान मिळवण्यासाठी लागणारी साधने असायची… पण भरपूर शिकून व उच्चशिक्षित होऊन ते मिळतं का ? आणि मिळालं असेल तर तशा व्यक्ती समाधानी का नाहीत?

ज्ञानी माणसे म्हणजे नेमकी काय आणि ती शोधायची कुठे? बऱयाच जणांना प्रश्न पडतो तसाच मलाही नेहमी पडायचा. पण आज जेव्हा अशा व्यक्तिमत्त्वास भेटली तिथे मला माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली. तेव्हा मात्र माझ्या स्वतःमध्ये झालेल्या बदलामुळेच वातावरण आपोआप सुगंधमय वाटू लागले.

माझ्या गावाला एका साध्याशा विठ्ठल-रखुमाईच्या मंदिरात ‘काका महाराज’ म्हणून एक जुने कीर्तनकार आहेत… गेली 50 वर्षे नित्यनियमाने या मंदिरात संध्याकाळी ते कीर्तन करतात. आता तर या मंदिरातील प्रत्येक वस्तूला या गोड रसाळ कीर्तनाची सवय लागलीय… काका आपला गाव सोडून फारसे बाहेर जात नाहीत; पण हिंदुस्थानच काय जगाच्या कानाकोपऱयातील इत्थंभूत माहिती असते त्यांना. जेमतेम दहावी शिकलेले असले तरी भाषा मात्र अगदी शुद्ध. विशेषतः संस्कृत भाषेवर उत्तम प्रभुत्व असल्याने त्यांच्या श्लोकांमध्ये व निरुपणात श्रोते तल्लीन होऊन जातात.

वर्षोनुवर्षे मराठी व संस्कृत साहित्याचा वारसा जपणारं एक छोटंसं ग्रंथालय जणू यांनी उभं केलं होतं. या मंदिरात यांना बरेच जण भेटायला येतात. जुन्या-नव्या सर्व पिढींतील व्यक्तींशी ते तेवढय़ाच आपुलकीने व मायेने बोलत असत. येथील निरागस शांतता आणि काका महाराजांचे उमटणारे कीर्तनाचे बोल यामधून एक वेगळाच नाद तयार होत असे आणि त्यांच्या खुललेल्या व्यक्तिमत्त्वामध्ये अवघा परिसर मंत्रमुग्ध होत असे. त्यांच्या सकारात्मक विचारांचा दरवळ दाहीदिशांना आपोआप पसरला जाई आणि क्षणभर का होईना माणसातील दैवी स्वरूपाचा साक्षात्कार इथे मलाही घडून गेलाच. देव प्रत्येकाच्या अंतर्मनात दडलेला असतो… तो आपल्याच कर्मामध्ये विविध रूपाने बाहेर येत असतो हे सारेच विचार पटायला लागले होते मला.

आजच्या सुपरफास्ट व फास्टफूडच्या युगात काका महाराजांसारखी व्यक्तिमत्त्वे घडणे व जपणे खूप महत्त्वाचे आहे. आपल्या महाराष्ट्राच्या मातीला थोर संत व महात्मा यांच्या पुण्याईचा गंध आहे… त्यांच्या या ज्ञानगंगेत एकदा तरी प्रत्येकाने अभ्यंगस्नान केले पाहिजे. कोण जाणे त्यामुळे आपलं संपूर्ण आयुष्य सुहासिक बनेल.

[email protected]