लेकीसाठी लिहिलं शंभर गोष्टींचं पुस्तक, अभिनेता विनोद गायकरचा स्तुत्य उपक्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सध्याच्या टेक्नोसॅव्ही युगात वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे. हल्लीची मुले गोष्टींंची पुस्तके वाचत नाहीत. करमणुकीसाठी तासन्तास मोबाईलवर गुंतलेले असतात. गोष्टींतून मुलांपर्यंत चांगले संस्कार पोहोचवण्याची जबाबदारी पालकांची आहे, मात्र ‘वेळ नाही’ या कारणाखाली पालक बऱयाचदा ती टाळतात. याच धावत्या युगातल्या एका बाबाने आपल्या लेकीसाठी शंभर गोष्टींचे पुस्तक लिहिले आहे. ही स्तुत्य कामगिरी केलीय अभिनेता विनोद गायकर याने.

एकीकडे बालसाहित्य दुर्लभ होत असताना आपल्या लेकीसाठी म्हणजेच वेणूसाठी विनोदने ‘वेणूच्या गोष्टी’ आणि बडबड गीतांचे पुस्तक लिहिले आहे. याबाबत विनोद म्हणाला, गोष्ट मुलांचे मनोरंजन करण्यासोबत त्यांच्यावर संस्कार करते. त्यांना खूप काही शिकवते. मुलीच्या वाढदिवसानिमित्त तिला आगळीवेगळी भेट देण्यासाठी मी गोष्टींचे पुस्तक लिहायचे ठरवले, परंतु हे काम सोपे नव्हते. वर्षभराची मेहनत आणि खूप रिसर्चमधून हे पुस्तक आकारास आले आहे.

 मुलांसाठी गोष्टी लिहिताना त्यांचे मनोरंजन होईल, त्यांना कुठेही पंटाळवाणे वाटणार नाही याची काळजी घ्यावी लागते. एखादी गोष्ट मुलांना वाचून दाखवताना ती गोष्ट, त्यातील व्यक्तिरेखा त्यांच्या डोळ्यांसमोर उभ्या राहायला हव्यात असे विनोद सांगतो. गणपती बाप्पा लहान मुलांच्या आवडीचा म्हणून ‘गणूच्या गोष्टी’, वेणूला ‘फाइंडिंग द निमो’ हा सिनेमा आवडतो म्हणून समुद्र विश्वातल्या गोष्टी, तिच्याकडे डोनाल्ड डक टेडीबेअर आहे म्हणून ‘डिटेक्टिव्ह डकीच्या गोष्टी’ याशिवाय रोबो, प्राणी, जादू, भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याही गोष्टी लहान मुलांना समजतील अशा पद्धतीने पुस्तकात लिहिल्या आहेत. भविष्यात पुस्तकाचे प्रकाशन करण्याची त्याची योजना आहे.