
हिंदुस्थानला 1947 साली भीक मिळाली, खरे स्वातंत्र्य तर 2014 साली मिळाले, असे वादग्रस्त विधान करणाऱया अभिनेत्री कंगना राणावतविरोधात संताप व्यक्त होत असून अनेकांनी ‘पद्मश्री’ परत करण्याची मागणी केली आहे. त्यांना कंगनाने उत्तर देताना 1947 साली कोणते युद्ध झाले सांगा, ‘पद्मश्री’ परत करेन, अशी पोस्ट इन्स्टाग्रामवर टाकत आपल्या वक्तव्याचे समर्थन केले आहे.
देशाच्या स्वातंत्र्यासाठी 1857 साली पहिली एकत्र लढाई लढली गेली असे सांगतानाच सुभाषचंद्र बोस, राणी लक्ष्मीबाई आणि वीर सावरकरांच्या बलिदानावरही कंगनाने भाष्य केले आहे. 1857चे युद्ध मला माहिती आहे, पण 1947 साली कोणते युद्ध लढले गेले त्याची मला माहिती नाही. तेव्हा कोणते युद्ध झाले हे कोणी मला सांगितले तर मी माझा ‘पद्मश्री’ परत करायला तयार आहे. देशाची माफीही मागायला तयार असल्याचे कंगनाने इन्स्टाग्रामवर म्हटले आहे.
म्हणे, मला या प्रश्नांची उत्तरे हवी आहेत
मी राणी लक्ष्मीबाई यांच्या आयुष्यावर बनवलेल्या चित्रपटात काम केले आहे. 1857 साली लढल्या गेलेल्या युद्धावर मी खूप संशोधन केले आहे. तेव्हा लोकांमध्ये देशभक्ती प्रचंड वाढली होती. मग अचानक ती संपली कशी, असा सवाल कंगनाने केला आहे. तसेच गांधींजींनी भगतसिंगला मरण्यासाठी सोडून का दिले, सुभाषचंद्र बोस यांची हत्या का झाली, त्यांना गांधीजींचा पाठिंबा का मिळाला नाही, देशाची फाळणी एका इंग्रज अधिकाऱयाने का केली, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आनंद व्यक्त करण्याऐवजी देशवासीयांनी एकमेकांचे गळे का चिरले या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला हवी असल्याचेही कंगनाने स्पष्ट केले आहे.





























































