
ठाणे, पनवेल महापालिकेच्या हद्दीतील एमएमआरडीएची 50 टक्के घरे गिरणी कामगारांसाठी देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. पनवेलमधील एमएमआरडीएच्या 3500 घरांची सोडत जानेवारी 2022मध्ये काढण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे याआधी पनवेलमधील घरांच्या सोडतीत घर लागूनही ज्या कामगारांना अद्याप ताबा मिळालेला नाही त्यांनाही डिसेंबर 2021 अखेरपर्यंत घरांचा ताबा दिला जाणार आहे.
गिरणी कामगारांच्या रखडलेल्या घरांच्या प्रश्नावर गिरणी कामगार संयुक्त कृती सघटनांचे नेते आणि म्हाडाचे मुख्य अधिकारी यांची वांद्रे कार्यालयातील गुलजारीलाल नंदा सभागृहात शुक्रवारी बैठक पार पडली. म्हाडाचे मुख्य अधिकारी योगेश म्हसे, सहउपमुख्य अधिकारी गालांडे, म्हाडाचे इंजिनीअर, एमएमआरडीएचे आधिकारी बैठकीला उपस्थित होते. गिरणी कामगार पृती संघटनेच्या नेत्यांनी उपस्थित केल्याप्रमाणे सन 2012 व 2016मध्ये गिरणी कामगारांची सोडत काढण्यात आली होती. त्या सोडतीची प्रक्रिया डिसेंबर 2021पर्यंत पूर्ण करून प्रतीक्षा यादीही पूर्ण करण्याचे आश्वासन अधिकाऱयांनी बैठकीत दिले आहे. बैठकीत दोन्ही सालच्या प्रतीक्षा याद्याही पृती संघटनेकडे सुपूर्द करण्यात आल्या आहेत.
आंदोलन रद्द
गिरणी कामगार घराच्या प्रश्नावर येत्या 15 नोव्हेंबर रोजी म्हाडावर मोर्चा काढण्याचा निर्णय पृती समितीद्वारे घेण्यात आला होता. पण तो आता तात्पुरता रद्द करण्यात आला असला तरी म्हाडाकडून देण्यात आलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यात नाही आली तर कोणत्याही क्षणी आंदोलनाचे पाऊल उचलले जाईल, असा इशारा दिला होता. म्हाडा बैठकीत पृती संघटनेचे नेते जयप्रकाश भिलारे, निवृत्ती देसाई, प्रवीण घाग, नंदू पारकर, बजरंग चव्हाण, प्रवीण येरुणकर, लक्ष्मीकांत पाटील, बबन गावडे यांनी बैठकीच्या चर्चेत भाग घेतला.

































































