
थंडीत बदलत्या वातावरणामुळे सर्दी, पडसे, खोकला असे आजार होण्याची शक्यता असते. ऋतुमानानुसार या दिवसात आवळा खाणे फायदेशीर ठरते. पाहूया या दिवसांत आवळा खाण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ का देतात ?
आवळ्यामध्ये जीवनसत्त्व सी जास्त प्रमाणात असते. 100 ग्रॅम आवळ्यामध्ये 10 ते 30 टक्के जीवनसत्त्व सी असते. दररोज आवळा खाल्ल्याने ह्रदयविकारांना आळा बसतो.
हिवाळ्यात रोगप्रतिकारक्षमता कमी होते. आवळ्यामध्ये असणारी जीवनसत्त्वे थंड वातावरण आणि व्हायरसशी लढण्यासाठी शरीराला शक्ती पुरवतात. यामुळे या दिवसांत होणाऱ्या आजारांपासून शरीराचे रक्षण होते. यामुळे या दिवसात होणारे अनेक आजार टाळता येतात.
तोंड येण्याची समस्या असेल तर दररोज गरम पाण्यात आवळ्याचा रस मिसळून प्या. काही दिवसांनीच सतत तोंड येण्याची समस्या बंद होईल. तसेच रोज कच्चा आवळा खाल्ल्याने किंवा आवळा ज्यूस प्यायल्याने दात आणि हिरड्या मजबूत होतात.
आवळा खाल्ल्याने तोंडाच्या दुर्गंधीपासून सुटका होते. यामध्ये असलेल्या क्रोमियम या घटकामुळे रक्तातील साखरेवर नियंत्रण राहते. मधुमेह असलेल्यांकरिता आवळा हे एक उत्तम फळ आहे.
आवळ्यामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे त्वचेच्या अनेक समस्यांपासून सुटका होते. त्वचा नितळ आणि डागविरहित होते. आवळ्यामध्ये असलेल्या जीवनसत्त्व सी मुळे त्वचा हायड्रेटेड राहायला मदत होते. त्वचेवरील सूजही कमी होते. त्वचेतील कोशिकांमधला निर्जिवपणा दूर होतो.
आवळा केसांकरिताही अत्यंत गुणकारी आहे. यामुळे केसांतील कोंड्याची समस्या टाळता येते. केस चमकदार होतात. केस कोरडे किंवा पांढरे पडले असतील तर आवळ्याचे तेल केसांना लावतात. केसांच्या सर्वच तक्रारींवर आवळा फायदेशीर आहे.





























































