वीकेंडला प्रदर्शनाचा धडाका! ‘बंटी और बबली 2’ ते ‘धमाका’ थिएटर–ओटीटीवर पर्वणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

मनोरंजनसृष्टीत आता चैतन्य दिसू लागले आहे. थिएटर आणि ओटीटीवर चित्रपट, वेब सीरिज प्रदर्शित होऊ लागले आहेत. या वीकेंडला तर ‘बंटी और बबली 2’ पासून ते ‘धमाका’पर्यंत अनेक  सिनेमांचा खजिना प्रेक्षकांसाठी खुला झाला आहे. मराठी चित्रपट ‘झिम्मा’देखील प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

‘बंटी और बबली 2’ हा सैफ अली खान, राणी मुखर्जीचा चित्रपट मोठय़ा पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. सैफ आणि राणीची जोडी पुन्हा एकदा मोठय़ा पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

‘ये मर्द बेचारा’ या अनुप थापा दिग्दर्शित चित्रपटात विराज राव, मनुकृती पाहवा, सीमा भार्गव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे.

‘धमाका’ हा कार्तिक आर्यनचा ऍक्शन थ्रिलर चित्रपट  नेटफ्लिक्सवर 19 नोव्हेंबरपासून बघता येईल. बऱयाच दिवसांपासून या चित्रपटाची चर्चा आहे.

‘कॅश’ हा कॉमेडी चित्रपटही शुक्रवारी प्रदर्शित झाला. अमोल पराशर, स्मृती कालरा आणि गुलशन ग्रोव्हर अभिनित हा विनोदी चित्रपट डिस्नी प्लस हॉटस्टारवर बघता येईल.

‘युवर ओनर’ या वेब सीरिजचा दुसरा सीझन सोनी लिव्ह प्लॅटफॉर्मवर शुक्रवारपासून आलाय. या शोमध्ये जिमी शेरगिल, माही गिल, गुलशन ग्रोवर, पुलकित माकोल, जीशान यांच्यासह अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहे.

मराठी चित्रपट ‘झिम्मा’ शुक्रवारी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. ‘झिम्मा’चा ट्रेलर आणि गाण्यांना आधीच प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. चित्रपटाचे लेखन इरावती कर्णिक यांनी केले असून दिग्दर्शन हेमंत ढोमे याचे आहे. सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सोनाली, सायली संजीव, मृण्मयी गोडबोले, सिद्धार्थ चांदेकर हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.