
> गणेश उदावंत
महाराष्ट्र भूमी ही कलेचे माहेरघर आहे. हिंदुस्थानातील 64 कलांचा परिपोष याच भूमीत झाला, हे येथील कला आविष्कारांतून दिसून येते. प्रांताप्रांतात जसा भाषेचा बदल आढळतो तसेच कलेचे आहे. पण त्यातील भावभावना समाजाभिमुख राहिलेली आहे.
चित्रकलेची परंपरा विशेषतः महाराष्ट्र भूमीत रुळली, या चित्रकलेच्या प्रांतात अनेक कलावंत नावारूपाला आले. कलेचा वारसा असा अबाधित असल्यामुळेच मुंबईत सर जे.जे. कला महाविद्यालयाची स्थापना झाली. चित्रकलाविषयक परिपूर्ण शिक्षण देणारे हे महाविद्यालय अल्पावधीतच नावारूपाला आले. यातून शिक्षण घेतल्यावर अनेक कलाकारांनी चित्रकलेची परंपरा पुढे कायम ठेवली आणि आजही ही परंपरा कायम आहेच. चित्रकलेच्या प्रांतात मुक्तपणे मुशाफिरी करणारे जे काही चित्रकार होऊन गेले, त्यामध्ये दीनानाथ दलाल यांचे नाव अग्रस्थानी येते. छंद म्हणून दीनानाथ दलाल यांनी चित्रे रेखाटली, तीच पुढे त्यांची ओळख राहिली. चित्रातील आशयाला कसा आयाम द्यायचा, याचे कसब केवळ दलाल यांच्या शैलीतून दिसते. म्हणून दलाल यांची चित्रे लक्षवेधी व कौशल्यपूर्ण अशीच आहेत.
संशोधक तथा चरित्रकार डॉ. अनंत देशमुख यांनी ‘रंगांचा जादूगार ः दीनानाथ दलाल’ हे पुस्तकाच्या माध्यमातून चित्रकार दीनानाथ दलाल यांच्या जीवनातील विविध वळणे व वाटचालीचा आढावा शब्दबद्ध केला, तो वैशिष्टय़पूर्ण आहे. मूळचे गोवेकरी असणारे चित्रकार दलाल (30 मे 1926-15 जानेवारी 1971) हे कायमच मुंबईत वास्तव्यास राहिले. इथेच त्यांनी कलेचे आविष्करण केले. मुंबईशी त्यांची नाळ जुळली ती कायमची. दीनानाथ दलाल यांच्या चरित्राचा आलेख डॉ. देशमुख यांनी 11 प्रकरणांतून अधोरेंखित केला. दलाल यांचे प्रारंभीचे म्हणजे बालपण, वैवाहिक जीवन, स्वभाव, स्नेहीजन, दलाल आर्ट स्टुडिओ, शिवचरित्र आणि शेवटचे उदासवाणे सावट ही प्रकरणे विशेष आहेत. दलाल यांनी संपादन केलेल्या ‘दीपावली’ या अंकाने रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण केले. त्यासंदर्भातील माहिती रौप्यमहोत्सव ‘दीपावली ः लंडन विशेषांक’ या प्रकरणामध्ये देण्यात आलेली आहे.
दीनानाथ दलाल हे स्वभावतः मितभाषी होते. तितकेच ते खवय्ये होते आणि हलकाफुलका विनोद करून ते समोरच्याला आपलेसे करून घेत असत. दीपावली अंकात रेखाचित्र असो की मुखपृष्ठ, कॅलेंडर, जाहिरात, कथाचित्रे अशा विविध प्रकारची चित्रे त्यांनी काढली. कुणाच्याही चित्राची नक्कल न करता दलाल यांनी स्वतःची स्वतंत्रपणे शैली निर्माण केली. चित्रा, मौज, विविध वृत्त, स्त्री मेनका, सत्यकथा, जोत्स्ना, पारिजात, झंकार, नवयुग, किर्लोस्कर, प्रतिभा, रत्नाकर, मराठा, अभिरुची, दीपावली या व इतर अनेक मासिक-साप्ताहिकांमध्ये दलाल यांची चित्रे व रेखाटणे हमखास असायची. हिंदुस्थानी लघुचित्र, पौरात्य चित्र, दुरंगी, चौरंगी अशा विविध प्रकारे दलाल यांनी कलेचे दालन समृद्ध केले. त्यांनी चित्रकलेचा वारसा घरोघरी पोहोचता केला, यातच त्यांचे मोठेपण आहे.
चित्रकार दलाल यांच्याविषयी अनेक साहित्यिकांनी आदरभाव व्यक्त केला. दलालांच्या चित्रांचे कौतुक अमेरिकेतील एका नियतकालिकाच्या संपादकाने केले असल्याचे प्रसिद्ध कथालेखक ना.सी. फडके यांनी म्हटले आहे. ‘पुस्तकांची रंगीत मुखपृष्ठ काढणारे अनेक चित्रकार झाले, पण दलालांची सर कुणालाच आली नाही. रेखा पद्धती, छाया प्रकाश, कॉम्पोझिशन इत्यादी दुर्मिळ गुण तर त्यांच्या चित्रात असतच; परंतु त्यांच्या रंगयोजनेत जी जादू हटकून असते ती दुसऱ्या कुणा चित्रकाराला साधली नाही. अशा प्रकारे ना.सी. फडके यांनी दलालांविषयी मत मांडले आहे. शिवसेना प्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विशेष स्नेह होता. या आठवणी जागवत ‘स्नेहीजन’ या प्रकरणामध्ये ‘बाळासाहेब ठाकरे’ या नावाने स्वतंत्र लेख लेखकाने दिलेला आहे.
एकूण 126 पानांच्या या चरित्रात्मक पुस्तकातून दीनानाथ दलाल यांच्या चित्रविषयक जीवनकार्याचा मागोवा लेखकाने छानपणे घेतला आहे. माहितीची मांडणी करताना आवश्यक तिथे मान्यवरांचे टिपण नोंदवून विषय खुलविला आहे. यासोबतच कृष्णधवल व बरीचशी रंगीत चित्रे दिल्याने पुस्तकाची मांडणी दर्जेदार झाली आहे. दलाल यांच्याविषयी संशोधन करणाऱ्यांना तसेच चित्रकलेचा अभ्यास करणाऱ्यांसाठी हे पुस्तक महत्त्वाचे संदर्भग्रंथ ठरू शकेल, यात तीळमात्र शंका नाही.
रंगांचा जादूगार ः दीनानाथ दलाल
लेखक ः डॉ. अनंत देशमुख
प्रकाशक ः राजहंस प्रकाशन प्रा.लि.
पृष्ठs ः 126, मूल्य ः रुपये 170/-
























































