राहुल गांधींना हायकोर्टाचा तूर्तास दिलासा; 20 डिसेंबरपर्यंत दाव्याची सुनावणी पुढे ढकलण्याचे दंडाधिकारी न्यायालयाला आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्र सरकारच्या राफेल विमान खरेदी व्यवहारावरुन राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून चौकीदार चोर हैं असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. याप्रकरणी भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकत मुंबईत खटला दाखल केला आहे. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने राहुल गांधींना आज तूर्तास दिला दिला. न्यायालयाने फौजदारी मानहानीच्या दाव्याची सुनावणी 20 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्याचे आदेश दंडाधिकारी कोर्टाला दिले आहेत.

जयपूरच्या एका सभेत राहुल गांधींनी, ‘गली गली मे शोर है, हिंदुस्थान का चौकीदार चोर है’ अशा घोषणा दिल्या होत्या. तसेच 24 सप्टेंबरला ट्विट करून राहुल गांधींनी मोदींना उद्देशून अपमानकारक, मानहानीकारक विधाने केली. राफेलबाबत मोदी यांच्यावर ‘कमांडर इन थीफ’, ‘चौकीदार चोर हैं’, ’चोरो का सरदार’अशी टीका राहुल गांधींनी केली होती. राहुल गांधींच्या या वक्तव्यामुळे मोदी यांच्यासह भाजपा आणि सदस्यांची बदनामी झाली आहे. त्यामुळे अब्रुनुकसानीचा दावा ठोकत भाजप कार्यकर्ते महेश श्री श्रीमल यांनी राहुल गांधींविरोधात फौजदारी तक्रार दाखल केली आहे. या दाव्यावर कारवाई सुरू करण्याचे आदेश गिरगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयाने दिले असून त्याबाबत राहुल गांधींना कोर्टापुढे हजर राहण्याचे आदेश दंडाधिकारी न्यायालयाने दिले होते. याप्रकरणी दाखल झालेली तक्रार रद्द करण्यासाठी राहुल गांधी यांच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर आज न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्यासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी तक्रारदार महेश श्री श्रीमल यांनी या प्रकरणी उत्तर दाखल करण्यासाठी न्यायालयाकडे वेळ मागितला. न्यायमूर्तींनी दोन आठवडय़ाचा अवधी दिला. त्यावेळेस राहुल गांधी यांची बाजू मांडणारे ऍड. सुदीप पासबोला आणि ऍड. कुशल मोर यांनी 25  नोव्हेंबर रोजी दंडाधिकारी न्यायालयात सुनावणी असल्याची माहिती न्यायमूर्तींना दिली न्यायमूर्तींनी याची दखल घेत ही सुनावणी 20 डिसेंबरच्या पुढे ढकलण्यास दंडाधिकारी न्यायालयास सांगितले.