
सातारा आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी रविवारी चुरशीने मतदान झाले होते. या दोन्ही बँकांसाठी उद्या (दि. 23) सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू होणार आहे. या दोन्ही निवडणुकांमध्ये अनेक बडय़ा नेत्यांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. त्यामुळे निकालाबाबत सर्वांनाच प्रचंड उत्सुकता आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या जिल्हा बँकांच्या निवडणुका सर्वच पक्षांसाठी महत्त्वाच्या ठरणार आहेत.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीतील सर्वांनाच प्रचंड औत्सुक्य असलेल्या सोसायटी मतदारसंघांचे निकाल दहा वाजेपर्यंत लागण्याची शक्यता आहे. संपूर्ण मतमोजणी दुपारी 12 पर्यंत पूर्ण होईल, अशी आशा आहे. जिल्हा बँकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचीच सत्ता राहणार असली तरी काही जागांचे निकाल धक्कादायक लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. जावली व कराड सोसायटी मतदारसंघांच्या निकालाकडे जिल्ह्याच्याच नव्हे, तर राज्याच्या नजरा लागून राहिल्या आहेत.
उद्या (दि. 23) सकाळी आठ वाजता सातारा येथील जरंडेश्वर नाका येथील नागरी बँक्स असोसिएशनच्या सभागृहात मतमोजणीस सुरुवात होणार आहे. यासाठी 11 तालुक्यांसाठी 11 टेबलची व्यवस्था आहे. दहा वाजेपर्यंत हा निकाल अपेक्षित आहे. त्यानंतर पतसंस्था व बँका मतदारसंघ, राखीव मतदारसंघांची मतमोजणी होईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मनोहर माळी यांनी दिली.
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी 85.31 टक्के रविवारी चुरशीने मतदान झाले होते. जिल्ह्यातील 2573 पैकी 2195 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानात आटपाडीत सर्वाधिक 99.38, तर सांगलीत सर्वांत कमी 53.21 टक्के मतदान झाले होते. मिरजेतील शेतकरी भवनामध्ये सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. प्रशासनाकडून मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. 12 टेबलवर मतमोजणी होणार असून, त्यासाठी 60 कर्मचाऱयांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतमोजणीला एका टेबलवर तीन कर्मचारी काम करतील. मतमोजणीच्या सुरुवातीला सोसायटी गटातील एकाच वेळी सात जागांची मतमोजणी होईल. त्यासाठी दीड तासाचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर उर्वरित गटातील मते एकत्रित करून मोजणीला सुरुवात होईल.
सांगलीतील दिग्गजांचे भवितव्य ठरविणारी निवडणूक
सांगलीत आमदार मोहनराव कदम, विक्रमसिंह सावंत, माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, माजी मंत्री अजितराव घोरपडे बँकेचे विद्यमान अध्यक्ष दिलीपतात्या पाटील, उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, विशाल पाटील, सत्यजित देशमुख, पृथ्वीराज पाटील यांच्यासह दिग्गजांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले होते. जिल्हा बँकेच्या 21 पैकी तीन जागा बिनविरोध झालेल्या आहेत. जत व आटपाडी सोसायटी गट आणि मजूर सोसायटय़ा, पतसंस्था-बँका या गटात काटय़ाची लढत झाल्याने येथील निकालांकडे सर्वांचे लक्ष आहे.
‘कराड’, ‘जावली’च्या निकालाबाबत सर्वांनाच उत्सुकता
सातारा जिल्हा बँकेच्या एकूण 21 जागांपैकी 11 जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित 10 जागांसाठी 20 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. कराड सोसायटी मतदारसंघात विलासकाका पाटील-उंडाळकर यांच्या निधनानंतर होत असलेल्या या निवडणुकीत त्यांचे चिरंजीव ऍड. उदयसिंह पाटील-उंडाळकर हे नशीब अजमावत आहेत. सहकारमंत्री बाळासाहेब पाटील हे सत्तारूढ सहकार पॅनेलच्या वतीने रणांगणात उतरल्याने ही लढत प्रतिष्ठsची बनली आहे. तर, आमदार शशिकांत शिंदे विरुद्ध ज्ञानदेव रांजणे यांच्यातील संघर्षामुळे जावली सोसायटी मतदारसंघातील लढत सर्वाधिक चर्चेची बनली आहे. त्याचप्रमाणे पाटण, खटाव, माण सोसायटी मतदारसंघांच्या निकालाकडेही जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. पाटणमध्ये गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई विरुद्ध सत्यजित पाटणकर, खटावमध्ये नंदकुमार मोरे विरुद्ध प्रभाकर घार्गे, माणमध्ये संदीप पोळ विरुद्ध शेखर गोरे यांच्यातील सामना रंगतदार ठरला आहे.



























































