खाली दुकाना वर ड्रग्जची फॅक्टरी, आठवडाभरातील दुसरी कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नांदेड येथे दुकानाच्या आड सुरू असलेली ड्रग्जची फॅक्टरी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) ने उद्ध्वस्त केली. ड्रग्जची फॅक्टरी चालवणाऱया हरदयाल सिंह गुलाब सिंह कथोडिया, जीवन सिंह अवतार सिंह, जितेंद्गर सिंह प्रग्यान सिंह बुलर एनसीबीने अटक केली. एनसीबीने कारवाई करून 111 किलो ड्रग्ज जप्त केले आहेत. घटनास्थळाहून जप्त केलेला दीड किलो अफू जप्त केला असून तो याच फॅक्टरीमध्ये बनवल्याचा एनसीबीला संशय आहे.

मध्य प्रदेश, राजस्थान येथून नांदेड येथे ड्रग्ज आणले जात असल्याची माहिती एनसीबीला मिळाली. गेल्याच आठवडय़ात एनसीबीने नांदेड येथून मोठय़ा प्रमाणात गांजा जप्त केला होता. गांजा तस्करीप्रकरणी एनसीबीने दोघांना अटक केली होती. त्या दोघांच्या चौकशीत एनसीबीला काही माहिती मिळाली. त्या माहितीनंतर एनसीबीने नांदेड येथे कारवाई केली. झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या पथकातील अधिकाऱयाने नांदेड येथील  एका ट्रान्सपोर्टच्या कार्यालयात छापा टाकला. छापा टाकून दुकानाच्या आड सुरू असलेली ड्रग्ज फॅक्टरी उद्ध्वस्त केली. घटनास्थळी एनसीबीला 111 किलो ड्रग्ज सापडले आहे. तसेच दीड लाख रुपये रोख आणि पैसे मोजण्याचे मशीन जप्त केले आहे. तसेच एनसीबीने दीड किलो अफू जप्त केला आहे. तो अफू याच प्रयोगशाळेत बनवल्याचा एनसीबीला संशय आहे. या फॅक्टरीमध्ये तयार होणारे ड्रग्ज राज्यात काही ठिकाणी वितरित होत असल्याचे एनसीबीच्या सूत्रांनी सांगितले. ड्रग्जप्रकरणी त्या तिघांविरोधात एनडीपीएस कायद्याखाली गुन्हा दाखल करून अटक केली. हरदयाल हा पंजाबमधून ड्रग्ज आणायचा का, याचा तपास आता एनसीबी करत आहे.

पहाटेच तयार करायचे ड्रग्ज 

मूळचा पंजाबचा रहिवासी असलेला हरदयाल हा मुख्य सूत्रधार आहे. तो जीवन आणि जितेंदरच्या मदतीने पहाटे ड्रग्ज तयार करत होता. पॉपिस्टो हे ताजे असताना त्यातून बाहेर येणाऱया पदार्थातून ही टोळी अफू बनवत असायची. ड्रग्ज फॅक्टरीमध्ये एनसीबीच्या अधिकाऱयांना जी औषधे सापडली आहेत ती औषधे देशातील विविध राज्यांमध्ये तयार करून विकली जात होती. गेल्या तीन वर्षांपासून ही ड्रग्जची फॅक्टरी सुरू आहे.