
कोरोना नियंत्रणात आल्याने राज्यातील निर्बंध शिथिल केले जात आहेत. बहुतांश सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले आहेत. आता प्राथमिक शाळा सुरू व्हायच्या बाकी आहेत. त्यासाठीही राज्याच्या चाईल्ड टास्क फोर्सने हिरवा कंदील दिला आहे. पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यास टास्क फोर्सने परवानगी दिली आहे.
पहिली ते चौथी इयत्तेपर्यंतचे वर्ग सर्व अटीशर्तींसह सुरू करण्याची परवानगी चाईल्ड टास्क फोर्सने दिली असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. यासंदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होईल असे त्यांनी सांगितले.
ग्रामीण भागांमध्ये पाचवी ते बारावी तर शहरांमध्ये आठवी ते बारावीचे वर्ग यापूर्वीच सुरू झाले आहेत. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱयांचे लसीकरण पूर्ण झाल्याने पहिलीपासूनचे वर्ग सुरू करण्यास हरकत नसावी असे तज्ञांचे म्हणणे आहे.
परवानगी मिळताच लसीकरण
राज्यात लहान मुलांच्या लसीकरणाला अजून सुरुवात झालेली नाही. कोव्हॅक्सिन ही लस लहान मुलांना देता येऊ शकते असे तज्ञांचे मत आहे. त्यासाठी केंद्र सरकारने परवानगी दिली तर राज्यात कोव्हॅक्सिन मोठय़ा प्रमाणात उपलब्ध आहे. परवानगी मिळताच लसीकरणाला सुरुवात करता येऊ शकते.
तिसरी लाट आली तरी तीव्र नसेल
कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटऐवजी दुसरा कोणताही नवा व्हेरिएंट राज्यात दिसून आलेला नाही. तिसऱया लाटेची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे; परंतु तिसरी लाट आली तरी ती तीव्र नसेल. मात्र सावधगिरीसाठी कोरोना नियमावलीचे पालन आणि 100 टक्के लसीकरण करावे लागेल, असे टोपे यांनी म्हटले आहे.
































































