
बॉलीवूडच्या संगीत क्षेत्रातील आघाडीचे तालवादक भीमराव मोहिते यांचे वयाच्या अवघ्या 50 व्या वर्षी एका कार्यक्रमाच्या दरम्यान आकस्मिक निधन झाल्यामुळे संगीत क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. भीमराव मोहिते यांना संगीतमय श्रद्धांजली वाहण्यासाठी संगीत क्षेत्रातील मान्यवर एकवटले असून त्यांनी ‘तालयात्री भीमराव’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. येत्या बुधवार, 1 डिसेंबरला रात्री 8 वाजता बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाटय़गृहात हा कार्यक्रम पार पडणार आहे.
तीस वर्षांपासून भीमराव मोहिते संगीत क्षेत्रात होते. बॉलीवूडमधील ते नावाजलेले तालवादक होते. ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले, सोनू निगम, शान, रेखा भारद्वाज, शंकर महादेवन अशा दिग्गजांसोबत त्यांनी अनेक परदेश दौरे केले होते. ‘सारेगमप’ आणि ‘इंडियन आयडॉल’सारख्या कार्यक्रमातही त्यांनी आपली छाप पाडली होती. ‘तालयात्री भीमराव’ या कार्यक्रमात भीमराव मोहिते यांनी बॉलीवूडच्या ज्या दिग्गज कलाकारांसोबत साथसंगत केली ते दिग्गज वादक ही संगीतमय श्रद्धांजली वाहणार आहेत. प्रसिद्ध संगीत संयोजक अनुपम घटक यांच्या नेतृत्वाखाली शैलजा सुब्रमण्यम, आलोक काटदरे आणि जयंत पिंगुळकर हे आघाडीचे गायक कार्यक्रमात सहभागी होणार असून निवेदनाची धुरा समीरा गुजर सांभाळणार आहेत. या कार्यक्रमाच्या उत्पन्नातून होतकरू नव्या कलावंतांना भीमराव मोहिते यांच्या नावाने शिष्यवृत्ती देण्याचे आयोजकांनी ठरवले आहे.



























































