
>> विवेक दिगंबर वैद्य
नाशिकचे सर्वांगीण स्थानमाहात्म्य विविधांगाने फुललेले आणि बहरलेले आहे यात शंकाच नाही. नाशिक हा तीर्थक्षेत्रे, मंदिर-लेणी, डोंगरदुर्ग, संग्रहालये आणि समृद्ध, संपन्न पर्यटनस्थळांची जपणूक करणारा परिसर आहे. नाशिकच्या शहरी व ग्रामीण भागात प्राचीन ते अर्वाचीन अशा दोहोंचा सुरेख संगम आढळतो.
नाशिक हा तीर्थक्षेत्रे, मंदिर-लेणी, डोंगरदुर्ग, संग्रहालये आणि समृद्ध, संपन्न पर्यटनस्थळांची जपणूक करणारा परिसर आहे. नाशिकच्या शहरी व ग्रामीण भागात प्राचीन ते अर्वाचीन अशा दोहोंचा सुरेख संगम आढळतो. मुंबई, ठाणे, धुळे, सटाणा, नगर-पुणे, सुरत या शहरांना रस्ते वाहतूक मार्गाने जोडलेले नाशिक हे पर्यटनदृष्टय़ा अनन्यसाधारण महत्त्वाचे आहे.
नाशिकपासून 80 कि.मी. अंतरावर महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील ‘सापुतारा हिल स्टेशन’ हे थंड हवेचे उंच वसलेले पर्यटनस्थळ आहे. मात्र येथील सर्व ‘पॉइंटस्’ पायी चालत बघण्याइतक्या अंतरावर आहेत. सापुताऱयातील सनसेट पॉइंटनजीक ‘रोपवे’ची सुविधा आहे. या रोपवेतून जाताना भोवतालचा रमणीय आसमंत नेत्रसुखद आहे. व्हॅली ह्यू पॉइंटवरून सापुताऱयातील दरीखोऱयाचे विहंगम दर्शन घडते. वनखाते निर्मित आयुर्वेदिक वनस्पती उद्यान, मधुमक्षिकापालन केंद्र जिज्ञासू पर्यटकांना वैचारिक खाद्य मिळवून देते. कलाग्राम येथे भेट देऊन तेथील उत्कृष्ट कलाकुसरीचे काम पाहून रसिक मंडळी खूश होतात. येथे हस्तकौशल्याच्या वस्तू बनविण्याचे प्रशिक्षण दिले जाते. आदिवासी जीवनशैलीचे सर्वांगसुंदर दर्शन घडवणारे संग्रहालय हे सापुतारामधील महत्त्वाचे आकर्षण आहे.
आदिवासी जमातीत वापरला जाणारा पेहराव, त्यांची पारंपरिक वाद्ये, त्यांनी तयार केलेल्या आकर्षक वस्तू, दागदागिने पर्यटकांना आकर्षून घेतात. येथील ‘स्टेप गार्डन’मध्ये निसर्गातील अनेकविध फुलझाडांचे दर्शन घडते. येथून जवळच सापुतारा लेक अर्थात विस्तीर्ण जलाशय आहे.
मुंबई-नाशिक महामार्गावर कसारा घाट ओलांडून इगतपुरीकडे जाताना ‘भंडारदरा’ धरण पाहता येते. नाशिकपासून 70 किमीवर भंडारदरा परिसरातील ‘रंधा’ धबधबा पर्यटकांच्या आकर्षणाचा विषय असतो. येथे पर्यटन महामंडळाची निवास व भोजन व्यवस्था उपलब्ध आहे. भंडारदरा जलाशयाच्या मागे गिरीप्रेमींचा आवडता रतनगड आहे, तर धरणाच्या उजव्या अंगाला सह्याद्री पर्वतरांगांतील सर्वात उंच ‘कळसूबाई’ शिखर दृष्टोत्पत्तीस पडते. येथे कळसूबाई देवतेचे मंदिर पाहावयास मिळते. अनेक गिरीप्रेमी, ट्रेकर्स, कळसूबाई शिखरावर चढाई करतात. येथील परिसर जैवसमृद्ध आहे. फुले-फळे, पशु-पक्षी यांचे अवचित घडणारे विलोभनीय दर्शन तसेच खळे-जावळे, अलंग-कुलंग, सप्तशृंग, मार्कंड, रतनगड, धोडप, हरिच्छंद्रगड हे दुर्ग नजरेचे पारणे फेडतात. रतनवाडी येथील अमृतेश्वर शिल्पमंदिर अतिशय देखणे आहे. रतनगड किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेल्या रतनवाडी येथे अकराव्या शतकातील प्राचीन, चालुक्य परंपरेतील श्रीअमृतेश्वर मंदिर चार मीटर उंच असून त्यावर तितक्याच उंचीचे कोरीव कलाकुसरयुक्त शिखर पाहावयास मिळते. मंदिराचे खांब, भिंती आणि छतावरील शिल्पकलेचे अद्भुत कोरीवकाम पाहून मन लुब्ध होते. येथील समुद्रमंथन, यक्ष-किन्नर-गंधर्वादी शिल्पे आणि पुराणोक्त प्रसंग अप्रतिमरीत्या साकारलेली आहेत. जवळच असलेला ताशीव दगडातून निर्माण केलेला जलाशय ‘विष्णुतीर्थ’ नावाने ओळखला जातो. निसर्गाचे रंगविभ्रम मनापासून आवडतात त्या निसर्गप्रेमींसाठी हा परिसर आदर्शवत आहे.
नाशिक जिह्यातील त्र्यंबकेश्वर परिसरात पश्चिमेकडे दुगारवाडी गावचा धबधबा पावसाळ्यात पर्यटकांनी ओसंडून वाहतो. ब्रह्मगिरी पर्वतामागे बसगड-उटवडच्या नजीक असलेला हर्षगड किंवा हरिहर किल्ला अनवटपणाचा प्रत्यय देणारा आहे. नाशिक-नगर सीमारेषेवर पट्टेवाडी गावचा विश्रामगड (पट्टा), नाशिकनजीक बागलाण परिसरातील दुधा येथील किल्ला, दुधा गावापासून जवळच शिरपूर डोंगरदरीतील भीमाशंकर मंदिर, सटाणा-रावळगाव मार्गावरील देवळाणे येथील पुरातन शिवमंदिर, श्रीदुग्धेश्वर किंवा श्रीदोधेश्वर मंदिर आदी परिसर नित्य वहिवाटीचा नसला तरीदेखील नव्याचा शोध घेत, अनवट स्थळांचा मागोवा घेणाऱया पर्यटकांना आकर्षित करणारा आहे.
नाशिक जिह्याच्या मालेगाव तालुक्यातील गाळणा किल्ला, पेशवाईतील मराठा सरदार नारोशंकर याने मालेगाव येथे गिरणा व मोशिणी नद्यांच्या संगमापाशी बांधलेला किल्ला व झोडगे गावातील श्रीमाणकेश्वर पुरातन शिवमंदिर वेगळेपणामुळे लक्षात राहते. हेमाडपंथी धाटणीच्या श्रीमाणकेश्वर मंदिरातील कीर्तिमुख, बाह्य भागातील शृंगारशिल्पे, प्रवेशद्वारानजीकचे नंदीशिल्प, नक्षीदार स्तंभ व पशुपक्षी मानवादी शिल्पे हे श्रीमाणकेश्वर शिवालयाचे महत्त्वाचे वैशिष्टय़पूर्ण आकर्षण आहे. जैनांचे पवित्र क्षेत्र मांगीतुंगी, श्रीसाईबाबांचे वास्तव्य असलेले शिर्डी, शनिशिंगणापूर, कावनई गावातील पंपा सरोवर हे श्रीगजानन महाराज (शेगाव) यांचे तपश्चर्या स्थळ, तेथून जवळच असलेले श्रीकपिलधारा तीर्थ, दिंडोरी येथील श्रीस्वामी समर्थ मठ, श्रीदेव मामलेदार यांचे सान्निध्य लाभलेले सटाणा तसेच श्रीगजानन महाराज गुप्ते, श्रीगोपाळदास महंत (श्रीनरसिंग महाराज) आणि श्रीदेव मामलेदार यांची गोदावरी काठावरील समाधीस्थाने, श्रीबिडकर महाराज स्थापित एकमुखी दत्ताचे मंदिर, मोहाडीचा अष्टबाहू गोपाळकृष्ण, सर्वतीर्थ टाकेद, चांदवडची रेणुकामाता, सिन्नर परिसरातील श्रीगोंदेश्वर, धोडांबे येथील श्रीहरिहराचे शिल्पमंदिर, श्रीचंद्रेश्वर, श्रीगोरक्षनाथ मंदिर आदी अनेकविध स्थाने नाशिकचे ‘तीर्थक्षेत्ररुपी’ माहात्म्य अधोरेखित करतात.
नाशिक जिह्यातील अंजनेरी येथे असलेले नाणी संग्रहालय, पाथर्डी येथील तोफखाना संग्रहालय, सिन्नर येथील वैविध्यपूर्ण दगडांचे गारगोटी संग्रहालय, ओझर येथे असलेले प्रगती एरोस्पेस संग्रहालय, अंबड औद्योगिक वसाहतीतील कल्पवृक्ष ज्ञानसंग्रहालय, पांडव लेण्यांच्या पायथ्याशी असलेले नक्षत्रवन तसेच हिंदुस्थानी चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फळके यांचे स्मारक, भगूर येथील स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मस्थान, ज्येष्ठ मराठी साहित्यिक कुसुमाग्रज यांचे स्मृतिस्थान या व अशा विविध स्फूर्तिदायी वास्तूंमध्ये नव्या पिढीला प्रेरणा देणारे बरेच काही आहे. नाशिकचे सर्वांगीण स्थानमाहात्म्य विविधांगाने फुललेले आणि बहरलेले आहे यात शंकाच नाही.





























































