महाराष्ट्र, कर्नाटकसह गोव्यात घरफोडीचे 137 गुन्हे दाखल असलेल्या सराईताला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा राज्यात घरफोडी आणि चोरीचे तब्बल 137 गुन्हे दाखल असलेल्या पोलीस रेकॉर्डवरील अट्टल दरोडेखोरासह त्याच्याकडून चोरीचे सोने घेणाऱ्या त्याच्या मित्राला करवीर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी त्याच्याकडून आणखी पाच घरफोडय़ा आणि 12 लाखांच्या चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. विशाल नरसिंग शेरखान (वय 26, रा. जवाहरनगर), श्रीकांत दगडू भोसले (वय 26, रा. रुमाले मळा, पाचगाव, ता. करवीर) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.

करवीर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रायगड कॉलनीत गेल्या आठवडय़ात चोरटय़ाने एका घराच्या दरवाजाची कुलपे तोडून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे 12 लाख किमतीचा ऐवज चोरून नेला होता. याचा तपास सुरू असतानाच घरफोडी करणारा व पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार विशाल शेरखान हा चोरीचे दागिने विकण्यासाठी येणार असलेल्या ठिकाणाची माहिती पोलिसांना मिळाली. पथकाने सापळा रचून शेरखानच्या मुसक्या आवळल्या. त्याच्या ताब्यातून सुमारे 12 लाखांचे सोने-चांदीचे दागिने मिळून आले. त्याने रायगड कॉलनीत घरफोडी केल्याची कबुली दिली आहे. त्याचा मित्र श्रीकांत भोसले याने दागिने चोरीचे असल्याची माहिती असतानाही ते विकत घेतल्याने त्यालाही अटक करण्यात आली आहे.