
राजा महालाचे दार बंद करून बसला आहे, अशा शब्दांत भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.
देशभरातील शेतकरी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानात संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाच्या नेतृत्वाखाली किसान-मजदूर महापंचायत आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत एमएसपीच्या मागणीसोबत स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी, बेरोजगारी या मुद्दय़ांवरही चर्चा झाली.
यावेळी पत्रकारांशी बोलताना टिकैत यांनी मोदींवर खरपूस टीका केली. तुम्ही हायवे अडवून बसला आहात. तुम्ही मागे हटणार का, असा प्रश्न पत्रकारांनी केला असता टिकैत म्हणाले, आम्ही हायवेवर बसलेलो नाही. आमचेच मार्ग बंद केले आहेत. राजाने महालाचे दरवाजे बंद केले आहेत. दिल्ली हा कलियुगातील महाल आहे. आम्हाला फक्त राजाशी चर्चा करायची आहे.
एमएसपीची गॅरंटी, आंदोलनात शहीद झालेल्या सातशेपेक्षा जास्त शेतकऱयांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई, शेतकऱयांवर दाखल केलेले गुन्हे परत घेणे आणि सीड बिल लागू न करणे या आमच्या प्रमुख मागण्या आहेत. याशिवाय सरकारने आधी पुढाकार घेऊन आमच्या मागण्या मान्य कराव्या तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही. देशभरात आंदोलन सुरूच राहणार, असेही टिकैत यांनी ठामपणे सांगितले.
मोदी आता न्यायाधीश झाले
गुजरातचे मुख्यमंत्री असताना 2011 मध्ये मोदींनी एक समिती स्थापन केली होती. त्यावेळेस मोदींनी वकील बनून त्या समितीच्या अहवालाची बाजू मांडली होती, पण आता ते स्वतःच न्यायाधीश झाले आहेत. त्यांनी आता त्या समितीच्या शिफारशी लागू कराव्यात, असेही टिकैत म्हणाले.




























































