निळवंडे जलाशयात बुडून सख्ख्या भावांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
sunk_drawn

निळवंडे धरणाच्या बॅक वॉटरला असणाऱ्या पुलाखालील पाण्यात आंघोळीसाठी गेलेल्या सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली आहे. समीर शांताराम पवार (वय 14) आणि सोहम शांताराम पवार (वय 11, रा. राजूर, ता. अकोले) अशी मृतांची नावे आहेत.

राजूर येथील हे दोघे भावंडे आपल्या मुंबई येथील नातेवाईकांसोबत फिरण्यासाठी निळवंडे जलाशयावर गेले होते. त्यावेळी समीर आणि सोहम आंघोळीसाठी बॅक वॉटरला असणाऱ्या पुलाखाली गेले होते. मात्र, तेथे अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने भवरा तयार झाला. त्यामुळे दोघेही पाण्यात ओढले गेले. त्यांचे नातेवाईक आकाश जाधव व अर्जुन गायकवाड पुलावर उभे राहून जलाशयात पडणारे पाणी पाहत होते. त्यांनी समीर व सोहम यांना पाहण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोघेही न दिसल्याने त्यांनी शोधाशोध केली. त्यांचे कपडे व चप्पल घटनास्थळी दिसल्याने आकाशने वडिलांना याची माहिती दिली. मुले पाण्यात वाहून गेल्याचा संशय आल्याने स्थानिक मच्छिमार सोमनाथ मेंगाळ यांनी सायंकाळी नदीपात्रात टायर टाकून शोध घेतला. रात्री उशिरा त्यांना समीरचा मृतदेह सापडला. तर, सोमवारी सकाळी सोहमचा मृतदेह आढळून आला. राजूर येथील स्वामी समर्थ माध्यमिक विद्यालयात समीर 9 वीत, तर सोहम 6वीत शिकत होता.