
कोरोनाच्या ओमायक्रोन व्हेरिएंटविरोधी लढय़ात सिरम इन्स्टिटय़ूट पुढे सरसावली आहे. नव्या विषाणूचा प्रतिकार करण्यासाठी कोविशिल्ड लस किती प्रभावी ठरतेय, याची चाचपणी सुरू असून दोन-तीन आठवडय़ांतच या लसीची परिणामकारकता कळेल. त्यानुसार लसीकरणाबाबत पुढची पावले टाकली जातील, असे सिरम इन्स्टिटय़ूटचे सीईओ अदार पूनावाला यांनी मंगळवारी सांगितले.
जगभरात ओमायक्रोनची दहशत वाढत चालली आहे. याबाबत हिंदुस्थानही सतर्क झाला असून ओमायक्रोनवर कोरोनाच्या सध्याच्या लसी किती प्रभावी ठरताहेत याचा अभ्यास केला जात आहे. यादरम्यान सिरम इन्स्टिटय़ूटचे सीईओ पूनावाला यांनी कोविशिल्डसंदर्भात दिलासादायी बातमीचे संकेत दिले.
सध्या ओमायक्रोनवरील कोविशिल्डच्या परिणामकारकतेचा अभ्यास सुरू आहे. ऑक्सफर्डचे शास्त्रज्ञ याबाबत संशोधन करीत आहेत. या संशोधनातून पुढील दोन-तीन आठवडय़ांतच निष्कर्ष समोर येतील. त्याआधारे गरज भासल्यास नव्या लसीची निर्मिती करू शकतो. नंतर सहा महिन्यांत ही लस बुस्टर डोससाठी उपलब्ध केली जाऊ शकेल, असे पूनावाला यांनी सांगितले. ओमायक्रोन अधिक घातक आहे की नाही हे आता सांगता येणार आहे. यावर बुस्टर डोस हा आपल्यापुढे पर्याय आहे. मात्र सरकारने कोविड लसीचे दोन्ही डोस देण्यावर भर द्यावा, असेही ते म्हणाले.
मुबलक बुस्टर डोस पुरवण्याची तयारी
कंद्र सरकारने ओमायक्रोन रोखण्यासाठी बुस्टर डोस देण्याचा निर्णय घेतला तर आम्ही मुबलक प्रमाणात बुस्टर डोस पुरवण्यास तयार आहोत. राज्यांसाठी आम्ही 25 कोटी डोस राखीव ठेवले आहेत. तज्ञांच्या सल्ल्याने हा डोस दिला जाईल. 600 रुपयांपर्यंत ही लस मिळेल, असेही अदार पूनावाला यांनी स्पष्ट केले. आमच्याकडे कोव्होव्हॅक्स लसीचाही भरपूर साठा आहे. पुढील काही आठवडय़ांत या लसीला मंजुरी मिळेल, असे त्यांनी सांगितले.



























































