
राज्यात शाळा सुरू होण्याच्या तोंडावरच कोरोनाच्या ओमायक्रोन या नव्या व्हेरिएंटचा धोका समोर आल्याने पालकांमध्ये घबराटीचे वातावरण पाहायला मिळत आहे. आधी शाळा सुरू करा अशी मागणी करणारे पालकच आता बॅकफूटवर गेले असून ओमायक्रोनमुळे सध्या तरी पालकांनी ऑनलाइन शिक्षणालाच पसंती दिली आहे. मुंबईसह इतर महापालिका क्षेत्रातील पहिली ते सातवीच्या शाळा उद्या 1 डिसेंबरऐवजी 10 ते 15 डिसेंबरपासून सुरू होणार आहेत. मात्र ओमायक्रोनमुळे पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यास नकार दिल्याने शाळेतील उपस्थितीवर प्रश्नचिन्ह उभे राहणार आहे.
गेल्या दोन ते तीन दिवसांत जगभरात वेगाने फैलावत असलेल्या ओमायक्रोन व्हेरिएंटचा देशाला असलेला धोका पाहता मुंबई महापालिकेने 1 डिसेंबरऐवजी 15 डिसेंबरपासून पहिली ते सातवीच्या शाळा सुरू करण्याचे जाहीर केले आहे. येत्या 15 दिवसांत ओमायक्रोनचा धोका कमी न झाल्यास वर्गातील उपस्थितीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. ऑफलाइनबरोबरच ऑनलाइन शिक्षण सुरू राहणार असल्याने पालक विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्याची रिस्क उचलणार नाहीत. शिक्षक परिषदेचे शिवनाथ दराडे यांनी सांगितले, मुंबईतील शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलल्याने पालकांनी समाधान व्यक्त केले. काही पालकांनी डिसेंबरमध्ये शाळा सुरू न करण्याची मागणी केली आहे तर काहींनी आता थेट पुढच्या वर्षीच वर्ग सुरू करा, असे सांगितले आहे.
पालकांना हवी धोका टळल्याची हमी
ओमायक्रोन व्हेरिएंटचा धोका टळल्याची हमी देण्याची काही पालक मागणी करीत आहे. या व्हेरिएंटवर अधिक संशोधन झाल्यावर त्याच्या संसर्गाविषयी तसेच त्यामुळे निर्माण होणाऱया धोक्याविषयी चित्र स्पष्ट होताच प्रशासनाने शाळा सुरू करण्याविषयी पुढील कार्यवाही करावी. याविषयी पालकांनाही वेळोवेळी मार्गदर्शन आणि सूचना देण्यात यावी असेही काही पालकांचे म्हणणे आहे. इंडिया वाईड पॅरेंट्स असोसिएशनच्या अध्यक्षा अॅड. अनुभा सहाय यांनी सांगितले, नव्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर सरकारने शाळेत येणाऱया प्रत्येक विद्यार्थ्यांची जबाबदारी उचलणे आवश्यक आहे. देशात तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे सध्या तरी विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यास पालक तयार नाहीत. तिसऱया लाटेचा धोका टळल्यावर शाळा सुरू करणे योग्य ठरेल.
ओमायक्रोन व्हेरिएंटच्या बातम्या येण्याआधी शाळेतील 90 टक्के पालकांनी पाल्यांच्या उपस्थितीविषयी संमती असल्याचे लिहून दिले होते. पण आता अनेक पालक पाल्याला शाळेत पाठविण्यास धास्तावले आहेत. काही पालकांनी पह्न करून तर काहींनी एसएमएसद्वारे पाल्याला शाळेत पाठविण्यास तयार नसल्याचे कळविले आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे शाळा सुरू करा हे सांगणाऱया पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
– संजय डावरे, अध्यक्ष, महामुंबई मुख्याध्यापक संघटना
























































