
दिवसाची सुरुवात करणारी न्याहारी सगळ्यात महत्त्वाची मानली जाते, कारण रात्रीच्या जेवणानंतर 8 ते 10 तास काहीही न खाता सकाळचा नाश्ता केला जातो. त्यामुळे हा नाश्ता प्रथिनयुक्त आणि पौष्टिक असणे आवश्यक आहे. प्रथिनयुक्त आहारामुळे वजन नियंत्रणात राहते. मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी प्रथिने असलेला नाश्ता अतिशय फायदेशीर आहे. पाहूया सकाळच्या न्याहारीतले काही पौष्टिक पदार्थ.
बेसन पोळा
नाश्त्याच्या पदार्थांमध्ये केला जाणारा बेसन पोळा हा पौष्टिक नाश्ता आहे. 100 ग्रॅम चण्याच्या पिठामध्ये 20 ग्रॅम प्रथिने असतात. शिवाय फायबर, कॅल्शियम, आयर्न आणि मॅग्नेशियम हे घटकही असतात. चण्याच्या पिठामध्ये थोडेसे पाणी घालून चवीनुसार मीठ, ओवा आणि हळद घाला. हे मिश्रण ढवळा आणि तव्यावर थोडेसे तेल घालून पसरवा, शेकवा. हा पोळा टोमॅटो सॉस किंवा चटणीसोबत खाता येईल.
टोस्ट आणि सॉल्टेड अॅवोकाडो
नाश्त्यावेळी टोस्ट खाणे बऱ्याच जणांना आवडते. टोस्टला लोणी लावण्याऐवजी होल ग्रेन ब्रेड टोस्ट करून खाऊ शकता. या टोस्टला चिकन किंवा प्रोसेस फूड लावून खाण्याऐवजी अॅवोकाडो लावून सेवन करू शकता. अॅवोकाडो हा फॅटचा उत्तम स्त्रोत आहे. यामध्ये फायबर असल्यामुळे पोट भरलेले राहते. स्नॅक्सऐवजी हा नाश्ता केल्याने वजन कमी व्हायला मदत होते.
अंड आणि बिन्स
अंड्याचा हेल्दी डाएटमध्ये समावेश होतो. सँडविच, भाजी, चपातीचा रोल, उकडलेलं अंड, ऑमलेट अशा विविध पद्धतीने न्याहारीकरिता अंड्याचा समावेश केला जातो. भाज्यांमध्ये अंड घालून खाल्ल्याने वाढणाऱ्या वजनावर नियंत्रण राहतं. जर तुम्ही वजन घटवण्यासाठी प्रयत्न करत असाल तर उकडलेली कडधान्ये, राजमा यामध्ये अंड घालून नाश्त्याकरिता खाता येईल.
ओटस् आणि ग्रीक योगर्ट
ओटसमुळे वजन कमी होते, तर ग्रीक योगर्टमध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने असतात. ओट्समध्ये कॉम्प्लेक्स कार्ब्स, बीटा ग्लुकॉन आणि फायबर असते. त्यामुळे ओट्स आणि ग्रीक योगर्ट नाश्त्याच्या वेळी खाणे हा वजन कमी करणारा आणि कॅलरी कमी असणारा नाश्ता आहे.
पनीर भुर्जी
पनीरमध्ये कॅल्शियम, प्रथिने आणि हेल्दी फॅट असतात. पनीर भाजीत मिसळून तयार केलेली एखादी रेसिपीही सकाळी नाश्त्यावेळी वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. यामुळे आरोग्याचे इतर फायदेही होतात. ही भाजी भाकरीसोबत किंवा भाकरीशिवायही खाता येऊ शकते. पनीर आवडत नसल्यास अंड्याची भुर्जीही नाश्त्याच्या वेळी खाता येईल.
योगर्ट आणि बॅरीज
वजन कमी करायची इच्छा आहे, पण ओट्स खायला आवडत नाही ते लोकं योगर्ट आणि बॅरीजचं सेवन करू शकतात. योगर्टमध्ये जीवनसत्त्व सी, अँण्टीऑक्सीडंट आणि प्रथिने इत्यादी पौष्टीक घटक असतात. यामुळे शरीर तंदुरुस्त राहायला मदत होते.
























































