
कृषी कायद्यांविरोधातील आंदोलनादरम्यान 670 शेतकऱयांचा मृत्यू झाला असतानाही पेंद्रातील मोदी सरकारला याची माहितीच नाही. आंदोलनादरम्यान किती शेतकऱयांचा मृत्यू झाला याची नोंद उपलब्ध नाही. त्यामुळे मृत शेतकऱयांच्या कुटुंबीयांना भरपाई देण्याचा प्रश्नच येत नाही, अशी धक्कादायक भूमिका केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी बुधवारी संसदेत मांडत शेतकऱयांच्या कुटुंबीयांना अर्थसहाय्य करण्याची जबाबदारी झटकली. मोदी सरकारच्या या उत्तरावर विरोधी पक्षांनी जोरदार टीका केली आहे.
शेतकऱयांच्या लढय़ापुढे झुकून मोदी सरकारने नुकतेच तिन्ही कृषी कायदे मागे घेतले आहेत, मात्र मृत शेतकऱयांच्या कुटुंबीयांना भरपाई देण्याचे घोंगडे भिजत आहे. त्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरले आहे. कृषी कायद्यांविरोधात वर्षभर सुरू राहिलेल्या आंदोलनादरम्यान किती शेतकऱयांचा मृत्यू झाला, याची आकडेवारी सरकारकडे आहे का? तसेच संबंधित मृत शेतकऱयांच्या कुटुंबीयांना भरपाई देण्याचा सरकारचा विचार आहे का, असे प्रश्न विरोधी पक्षांनी बुधवारी हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱया दिवशी उपस्थित केले. त्यावर आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या शेतकऱयांची कृषी मंत्रालयाकडे कुठलीही नोंद नाही. त्यामुळे मृत शेतकऱयांच्या कुटुंबीयांना भरपाई देण्याचा प्रश्नच येत नाही, असे उत्तर केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी दिले. या उत्तरामुळे केंद्र सरकार विरोधी पक्षांच्या निशाण्यावर आले आहे.
हा शेतकऱयांचा अपमान
आंदोलक शेतकऱयांच्या मृत्यूची केंद्र सरकारकडे कुठलीही आकडेवारी नसणे हा शेतकऱयांचा अपमान आहे. जर सरकारकडे 670 शेतकऱयांचा रेकॉर्ड नाही मग त्यांनी कोरोना महामारीत लाखो लोकांचा डाटा कसा जमवला होता? दोन वर्षांत कोरोनाने 50 लाखांहून अधिक लोकांचा बळी घेतला, परंतु सरकारचे म्हणणे आहे की, केवळ चार लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, अशी टीका काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी मोदी सरकारवर केली आहे.
शेतकऱयांच्या कुटुंबीयांना भरपाई देण्याची संघटनांची आग्रही मागणी
जाचक कृषी कायद्यांच्या निषेधार्थ शेतकऱयांनी मागील वर्षभर राजधानी दिल्लीच्या सीमांवर तसेच देशभरात ठिकठिकाणी तीव्र आंदोलन सुरू ठेवले. या आंदोलनादरम्यान कडाक्याची थंडी, अपघात, हृदयविकाराचा झटका, आजारपण अशा विविध कारणांमुळे जवळपास 700 शेतकऱयांना प्राण गमवावा लागला, असा दावा शेतकरी संघटनांनी केला आहे. या शेतकऱयांच्या कुटुंबीयांना भरपाई देण्याची आग्रही मागणी संघटनांनी केली आहे.
निलंबित खासदारांचे आंदोलन सुरूच
राज्यसभेतून निलंबित करण्यात आलेल्या खासदारांनी आजही संसदेतील महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ घोषणाबाजी करत आंदोलन सुरूच ठेवले. राज्यसभेतील समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी आंदोलनस्थळी जाऊन खासदारांना चॉकलेट टॉफी व मेथीच्या पापडांचे वाटप करत आंदोलनकर्त्या खासदारांना पाठिंबा देत सरकारवर सडकून टीका केली. दरम्यान, खासदारांना संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित करण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात आजही विरोधकांनी राज्यसभेत व सभागृहाबाहेर आक्रमक भूमिका घेतली. सभागृहाचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी निलंबित खासदारांचे निलंबन सरकारने तातडीने परत घ्यावे अशी मागणी केली, मात्र सरकारकडून त्याला कोणताच प्रतिसाद न मिळाल्याने विरोधक अधिक संतप्त झाले. यावेळी झालेल्या जोरदार घोषणाबाजीमुळे कामकाज दुपारी दोनपर्यंत तहकूब करण्यात आले. त्यानंतरही गदारोळाची मालिका कायम राहिली.
115 कश्मिरी पंडितांचे कश्मीर खोऱयातून पलायन; सरकारची कबुली
2018 च्या तुलनेत जम्मू-कश्मीरमध्ये घुसखोरीच्या घटनांमध्ये कमालीची घट झाली असल्याचा दावा आज केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्यसभेत केला. यंदा घुसखोरीच्या केवळ 28 घटना घडल्या. त्याचवेळी 115 कश्मिरी पंडितांनी कश्मीर खोऱयातून पलायन केले. बहुतांश कश्मिरी पंडित सरकारी कर्मचारी आहेत. कडाक्याच्या थंडीत सरकारी कर्मचारी कश्मीरहून जम्मूला प्रयाण करतात, अशी पुस्तीही गृह मंत्रालयाने एका लिखित उत्तरात दिली आहे. कश्मिरी खोऱयात सुरक्षा दलाला दहशतवादी प्रामुख्याने टार्गेट करत असल्याचे सरकारने कबूल केले. मात्र 2009 मध्ये सुरक्षा दलांवरील हल्ल्याच्या 2258 घटना घडल्या होत्या. 2020 मध्ये हीच संख्या 665 वर खाली आली, असेही या उत्तरात नमूद कsले आहे.
संसदेत पत्रकारांना ‘नो एंट्री’; प्रवेशासाठी आज मोर्चा
कोरोना काळ सुरू झाल्यापासून पत्रकारांना संसदेच्या पत्रकार कक्षात बंदी करण्यात आली आहे. इतर अनेक गोष्टी निर्बंधमुक्त झालेल्या असताना संसदेत मात्र अजूनही पत्रकारांना प्रवेश दिला जात नाही. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात प्रेस गॅलरीत प्रवेश द्यावा या मागणीसाठी गुरुवारी दुपारी संसदेवर मोर्चा काढण्यात येणार आहे.
कोरोना संसर्गाचे कारण देत पत्रकारांना लोकसभा, राज्यसभेच्या प्रेस गॅलरीसोबतच संसदेच्या सेंट्रल हॉलमध्येसुद्धा प्रवेशास सक्त मनाई करण्यात आली आहे. संसद आवारातही सध्या लॉटरी पद्धतीने माध्यम संस्थाच्या प्रतिनिधींना प्रवेश दिला जातोय. त्यामुळे आठवडय़ातून दोनच दिवस एखाद्या संस्थेतल्या वार्ताहराला संधी मिळतेय. पत्रकारांच्या प्रवेशाबाबत विरोधी पक्षांनीही सरकारला निवेदने दिली आहेत. मात्र सरकारकडून निर्णय घेण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. सरकारच्या या कृतीचा प्रेस क्लब ऑफ इंडियाने एक पत्रक काढून निषेध केला आहे. गुरुवारी दुपारी सर्व ज्येष्ठ पत्रकार मोर्चा काढून आपला निषेध व्यक्त करणार आहेत.




























































