मराठीला अभिजात भाषेच्या दर्जासाठी राष्ट्रपतींना पत्र पाठविणार – सुभाष देसाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी राष्ट्रपतींना पत्र पाठविण्यात येणार आहे. त्याचा नमुना साहित्य संमेलनातील अभिजात मराठी दालनात ठेवण्यात येणार आहे. अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी आता सर्वसामान्य जनता पुढे येणार आहे, राष्ट्रपतींना पत्र पाठविणार आहे, अशी माहिती उद्योग आणि मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी दिली.

साहित्य संमेलनस्थळी कविवर्य कुसुमाग्रजनगरी येथे राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे उभारण्यात आलेल्या अभिजात मराठी दालनाची त्यांनी गुरुवारी पाहणी केली. यावेळी पालकमंत्री, संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ हे हजर होते. त्याप्रसंगी सुभाष देसाई पत्रकारांशी बोलत होते. अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठीचे सर्व निकष मराठीने पूर्ण केले आहे. त्याबाबतचे सर्व पुरावेही सादर करण्यात आले आहेत. साहित्य अकादमीच्या भाषा समितीने सर्व मान्य करून शिफारस केली आहे. आता फक्त केंद्र सरकारने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची प्रतीक्षा आहे, असेही ते म्हणाले. एक पिटीशन तयार करण्यात आले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र पाठविण्यात येणार आहे. या पत्राचा नमुना पाहून सर्वसामान्य जनता राष्ट्रपतींना पत्र लिहील आणि मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळविण्यासाठी पुढाकार घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.