
94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त शुक्रवार, 3 डिसेंबर रोजी सकाळी शहरातून ग्रंथदिंडी निघणार आहे. संमेलनस्थळी सकाळी 11 वाजता ध्वजारोहण होईल. मुख्य मंडपात दुपारी 4.30 वाजता संमेलनाचा उद्घाटन सोहळा होणार आहे. संमेलनास उद्घाटक प्रसिद्ध कादंबरीकार विश्वास पाटील, संमेलनाध्यक्ष, खगोलशास्त्र्ाज्ञ, विज्ञान साहित्यिक डॉ. जयंत नारळीकर, मावळते संमेलनाध्यक्ष फ्रान्सिस दिब्रिटो आणि प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. मावळते अध्यक्ष फ्रान्सिस दिब्रिटो संमेलनाध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांच्याकडे सूत्रे सोपवतील.
लोकहितवादी मंडळ आयोजित 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आडगाव येथील कविवर्य कुसुमाग्रजनगरीत 3 ते 5 डिसेंबर या कालावधीत होत आहे. शहरातील कविवर्य कुसुमाग्रज यांच्या निवासस्थानापासून शुक्रवारी सकाळी 8.30 वाजता ग्रंथदिंडी निघणार आहे. शहराच्या नऊ विभागातून ठरवून दिल्याप्रमाणे नऊ रंगांच्या वेशभूषेत नाशिककर आबालवृद्ध सहभाग घेतील. साहित्यातील नवरसांचे प्रतीक म्हणून नवरंगांचे दर्शन यात घडणार आहे. त्यानंतर सकाळी 11 वाजता संमेलनस्थळी कविवर्य कुसुमाग्रजनगरीत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा पार पडणार आहे. याचवेळी विजयराज बोधनकर यांच्या हस्ते कला प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱहे विशेष पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. सकाळी 11.30 वाजता मावळते संमेलनाध्यक्ष फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. यावेळी रावसाहेब कसबे प्रमुख पाहुणे असतील. याचवेळी प्रा. गो. तु. पाटील यांच्या हस्ते नाशिक येथील लेखकांच्या पुस्तक प्रदर्शनाचा शुभारंभ होईल. यावेळी कवी नरेश महाजन, डॉ. राम कुलकर्णी उपस्थित असतील.
अभिजात मराठी दालनाचा शुभारंभ
संमेलननगरीत मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते अभिजात मराठी दालनाचे उद्घाटन दुपारी 12 वाजता होणार आहे. यावेळी साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित, प्रधान सचिव भूषण गगराणी, सहसचिव मिलिंद गवांदे हजर असणार आहेत.
निमंत्रितांचे कवी संमेलन रंगणार
संमेलनाच्या पहिल्या दिवशी रात्री 8 वाजल्यापासून निमंत्रितांच्या कवी संमेलनाला सुरुवात होईल. त्याचे अध्यक्षस्थान श्रीधर नांदेडकर भूषवतील.
कविकट्टा आकर्षणाचे केंद्र
यंदा सलग 48 तास कविकट्टय़ावर काव्यवाचन सुरू राहणार आहे. त्याचे उद्घाटन रामदास फुटाणे यांच्या हस्ते होणार असून मुख्य पाहुणे म्हणून न्यायमूर्ती जे. पी. झपाटे, आयपीएस अधिकारी दत्ता कराळे, बी. जी. शेखर उपस्थित असतील. संयोजक राजन लाखे, प्रसाद देशपांडे आहेत.
संमेलन उत्तमरीत्या पार पडणार – पालकमंत्री भुजबळ
कविवर्य कुसुमाग्रजनगरीत बुधवारच्या पावसामुळे पाणी साचले, मात्र युद्धपातळीवर येथे काम सुरू आहे. संमेलन उत्तमरीत्या पार पडेल, असा विश्वास संमेलनाचे स्वागताध्यक्ष, पालकमंत्री छगन भुजबळ यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. संमेलनाध्यक्ष, खगोलशास्त्र्ाज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांना नाशिकला येण्यासाठी विमानाची व्यवस्था करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
बालकवी मंचावर 120 मुले कथा, कविता सादर करणार
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या 93 वर्षांच्या इतिहासात यंदा प्रथमच दोनदिवसीय बालकुमार साहित्य मेळाव्यासाठी स्वतंत्र दालन असणार आहे. यातील बालकवी मंचावर शनिवारी नाशिकसह विभागातील पाच जिह्यांतून 120 मुले-मुली सहभागी होऊन स्वरचित कविता आणि 14 कथा सादर करतील, अशी माहिती समितीचे उपप्रमुख प्रा. सोमनाथ मुठाळ यांनी दिली. बालकुमार साहित्य मेळाव्याचे उद्घाटन शनिवारी सकाळी 11 वाजता प्रसिद्ध अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या हस्ते करण्यात येईल. मेळाव्यात रविवारी बालसाहित्य समजून घेऊया, मुलांशी गप्पागोष्टी, बालसाहित्य आणि मुलांच्या कल्पनाशक्तीचा विकास, खगोल ते भूगोल, कल्पनांमधील नावीन्यता व विज्ञान या विषयांवर तज्ञ विचार मांडतील. दुपारी 1 वाजता समारोप सोहळा शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांच्या उपस्थितीत होणार आहे. समारोप सत्राआधी लहान मुलांचा सांस्कृतिक कलाविष्काराचा कार्यक्रमदेखील होणार आहे. यात बालकलाकार सृष्टी पगारे, राशी पगारे यांचे गायन, तर भैरवी तिपायले गणेश स्तुती हा कथ्थक आविष्कार सादर होईल.
संमेलनस्थळापर्यंत विनामूल्य बससेवा
आडगावच्या भुजबळ नॉलेज सिटीमध्ये साकारण्यात आलेल्या कविवर्य कुसुमाग्रजनगरीत पोहोचण्यासाठी साहित्य रसिकांना अडचण येऊ नये म्हणून नाशिक शहरातील बारा मार्गांवरून बस सोडण्यात येणार आहेत. दर पंधरा मिनिटांनी विनामूल्य बस सुविधा असेल. यासाठी महापालिकेने सिटीलिंकच्या माध्यमातून 50 बसेस दिल्या आहेत. सिटीलिंकच्या इतर बसेसद्वारे साहित्यरसिक महामार्ग आणि निमाणी बसस्थानकात पोहोचल्यास तेथे असणाऱया विनामूल्य बसद्वारे त्यांना संमेलनस्थळ गाठता येईल.

































































