
कृषिपंपाच्या वीज बिलातील थकबाकीत सुमारे 66 टक्के सूट मिळविण्याची संधी राज्य शासनाने ‘महाकृषी ऊर्जा अभियाना’द्वारे शेतकऱयांना दिली आहे. यामध्ये नगर जिल्ह्यातील 4 लाख शेतकऱयांच्या मूळ थकबाकीमधील 1649 कोटी 83 लाख रुपये माफ करण्यात आले आहेत. तर चालू वीज बिल व सुधारित थकबाकीपैकी 50 टक्के रक्कम मार्च 2022 पर्यंत भरणा केल्यास आणखी 1689 कोटी 21 लाख रुपयांची माफी मिळणार आहे. दरम्यान, नगर जिल्ह्यातील 9 हजार 356 शेतकरी वीज बिलांच्या थकबाकीमधून मुक्त झाले असून, त्यांचे वीज बिल कोरे झाले आहे.
‘महाकृषी ऊर्जा’ अभियान योजनेत नगर जिल्ह्यातील 3 लाख 95 हजार 868 शेतकऱयांकडे 5 हजार 30 कोटी 82 लाख रुपयांची थकबाकी होती. त्यातील 1649 कोटी 83 लाख रुपये माफ करण्यात आले आहेत. तसेच, वीज बिलांच्या दुरुस्तीद्वारे 2 कोटी 57 लाख रुपये समायोजित करण्यात आले आहेत. आता या शेतकऱयांकडे 3378.42 कोटींची सुधारित थकबाकी आहे. येत्या मार्च 2022 पर्यंत त्यातील 50 टक्के म्हणजे 1689 कोटी 21 लाख रुपये व चालू वीज बिलांचा भरणा केल्यास उर्वरित 1689 कोटी 21 लाख रुपयेही माफ करण्यात येणार आहेत.
आतापर्यंत नगर जिल्ह्यातील 1 लाख 60 हजार 515 शेतकऱयांनी वीज बिल थकबाकीमुक्तीच्या योजनेत सहभाग नोंदविला आहे. त्यांनी 77 कोटी 43 लाखांचे चालू वीज बिल व 45 कोटी 31 लाख रुपयांच्या सुधारित थकबाकीचा भरणा केला आहे. या सर्व शेतकऱयांचे व्याज व दंडमाफी, निर्लेखनाची सूट तसेच वीज बिल दुरुस्ती समायोजन आणि 50 टक्के थकबाकी माफीचे रुपये माफ करण्यात आले आहेत.
या योजनेचा लाभ घेत नगर जिल्ह्यातील 9 हजार 356 शेतकरी वीज बिलांच्या थकबाकीमधून मुक्त झाले आहेत. या शेतकऱयांनी 5 कोटी 82 लाख रुपये चालू वीज बिल व 50 टक्के थकबाकीचे 19 कोटी 12 लाखांचा भरणा केला असून, त्यांचे वीज बिल कोरे झाले आहे.



























































