
सध्याचा पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे पेरू उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. ढगाळ वातावरणामुळे हिरवा पेरू पिवळा पडत असल्यामुळे शेतकऱयांना फटका बसत असून, पेरूची गळतीही वाढली आहे. महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या राहाता तालुक्यातील पेरू फळबागांना सर्वाधिक फटका बसला आहे. दरम्यान, देवी, स्केल, निमेटोड, मिलीबग, पांढरी माशी या रोगांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पेरू बागा नामशेष होत चालल्या आहेत. त्यातच ढगाळ वातावरणामुळे पेरू उत्पादक शेतकरी अडचणीत सापडल्याचे चित्र दिसत आहे.
राहाता परिसरात लखनौ 49 या व्हरायटीच्या पेरूच्या मोठय़ा प्रमाणावर बागा आहेत. सध्या व्ही. एन. आर. वन केजी, तैवान पिंक, जी विलास, बर्फ खान या जातींच्या पेरूंची लागवड शेतकरी मोठय़ा प्रमाणावर करत आहेत. फळांना आलेली कीड कमी होण्यासाठी वर्षातून 3 ते 4 वेळा औषधफवारणी आवश्यक आहे. पेरू उत्पादक शेतकरी शेणखत व रासायनिक खतांचा वापर करून दर्जेदार फळ आणण्यासाठी मोठय़ा प्रमाणात खर्च करतात. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, रावेर, जळगाव, पाचोरा, चिखली, बुलढाणा याबरोबरच अन्य जिल्ह्यांत व परराज्यांत पेरूची मोठय़ा प्रमाणावर लागवड झाल्याने सुरत, मुंबई, गुजरात, अमदाबाद, बडोदा या ठिकाणी विक्री करण्यासाठी मुख्य बाजारपेठेत पेरूची मोठय़ा प्रमाणात आवक होत असल्याने राहाता परिसरातील पेरूला मागणी कमी होत चालली आहे.
पेरूपासून चांगले उत्पन्न मिळत असल्याने बाजारपेठेमध्ये खरेदी-विक्रीची उलाढाल मोठय़ा प्रमाणात होत होती. परिणामी तालुक्यातील दुकान, व्यावसायिकांना मोठा आर्थिक फायदा होत होता; परंतु गेल्या 3 वर्षांपासून पेरू फळबागांवर विविध प्रकारच्या कीड रोगाने व ढगाळ वातावरणामुळे पेरू उत्पादकांना आर्थिक हानी पोहोचत आहे. त्यामुळे शहरातील अर्थकारणावर मोठा परिणाम दिसू लागला.
पिवळय़ा पेरूची होतेय कमी दरात विक्री
ऑगस्ट ते जानेवारी हे 6 महिने पेरू फळ काढणीसाठी मुख्य मानले जातात. राहाता तालुक्यात पेरू खरेदी करण्यासाठी मुंबई, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गोंडल या ठिकाणचे व्यापारी येतात. मात्र, गेल्या 3 वर्षांपासून ऑगस्ट ते जानेवारी या पेरू काढणीसाठी असलेल्या मुख्य महिन्यात हवामानात मोठय़ा प्रमाणात बदल होताना दिसत आहे. ढगाळ हवामानामुळे हिरवा असणारा पेरू पिवळा होतो. परिणामी 25 रुपये प्रतिकिलो विकला जाणारा हिरवा पेरू 7 ते 8 किलोप्रमाणे विकावा लागतो. 5 ते 6 महिने शेतकऱयांना उत्पन्न देणारा पेरू ढगाळ हवामानामुळे पिवळे होऊन लगेच जमिनीवर पडतात. त्यामुळे पेरू उत्पादक शेतकऱयांची मोठी आर्थिक हानी होत आहे.




























































