
ऑनलाईन वाचन वाङ्मय विकासाला तारकच आहे. आजच्या डिजिटल युगात अर्थ समजून वाचण्यासाठी ते गरजेचे असले तरी त्यातील अद्ययावतीकरण, त्रुटी दूर करण्याची गरज असल्याचे मत डॉ. दिलीप धोंडगे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले.
कुसुमाग्रजनगरीत रविवारी सकाळी लोककवी वामनदादा कर्डक मंचावर ‘ऑनलाईन वाचन ः वाङ्मय विकासास तारक की मारक?’ या विषयावर श्रुतीश्री वडगबाळकर, डॉ. विलास साळुंके, मयूर देवकर व मंदार भारदे यांनी आपले विचार व्यक्त केले. समारोपाप्रसंगी अध्यक्ष डॉ. धोंडगे यांनी दोन्ही प्रकारच्या वाचनातील मुलभूत भेद स्पष्ट केले. त्यासाठी उदाहरणे दिली. दोन्ही वाचनातील बलस्थाने अन् त्रुटी सांगितल्या.
कोरोना काळात वाचनालयापर्यंत पोहोचणे शक्य नसल्याने वाचनभूक ऑनलाईन पुस्तकांनीच भागवल्याची माहिती यावेळी श्रुतीश्री वडगबाळकर यांनी दिली. ऑनलाईनमुळे वाचनसंख्या वाढल्याचे त्या म्हणाल्या. मात्र, वाचनाच्या दर्जाबाबत त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. कोरोना काळात लिहिलेल्या आपल्या कादंबरी लेखनासाठी गुगलची मोठी मदत झाल्याचे त्या म्हणाल्या. मात्र, ऑनलाईन वाचनात पुस्तकाचा रंग, वास, स्पर्श यांना आपण मुकत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. ऑनलाईन वाचन लाईटचा दिवा, तर पुस्तक वाचन समई असल्याचे त्यांनी सांगितले. गुलबर्गा येथील डॉ. विलास साळुंखे यांनीही ऑनलाईन वाचक पूरक असल्याचे उद्गार काढले. आजच्या तरुणाईला मागच्या जाणत्या पिढीने कोणते ऑनलाईन वाचन गरजेचे आहे, याचे मार्गदर्शन करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.































































