परदेशातून सांगलीत आलेले 45 प्रवासी अद्यापि नॉट रिचेबल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

परदेशातून सांगली महापालिका क्षेत्रात आलेल्या 99 प्रवाशांपैकी अद्यापि 45 जणांचा संपर्क झालेला नाही, तर आरटीपीसीआर चाचणी केलेल्या 11पैकी पाचजणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्यात आफ्रिकेतून आलेल्या एका तरुणाचाही समावेश आहे.

परदेशातून आलेल्या 99 नागरिकांच्या शोधासाठी सांगली महापालिका क्षेत्रातील 20 प्रभागांसाठी 20 पथके नियुक्त करण्यात आली होती. 60 आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मदतीने परदेशातून आलेल्या प्रवाशांचा शोध सुरू केला. दिवसभरात 51 जणांशी संपर्क साधण्यात आला होता. तर, आज उर्वरित इतर प्रवाशांशी संपर्क साधण्यात आला.

दोन दिवसांच्या प्रयत्नानंतर 99 नागरिकांच्या स्थानिक पत्त्यावर पथकाने जाऊन खात्री केली असता, 51 नागरिकांचा संपर्क झाला, तर 45 नागरिकांचा संपर्क होऊ शकला नाही. यातील 43 नागरिक परत गेले असल्याची माहिती समोर आली आहे. फक्त 11 नागरिकांची प्रत्यक्ष भेट होऊ शकली आहे. त्यांची आरटीपीसीआर चाचणी घेण्यात आली असून, पाच जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. यामध्ये मध्ये मध्य आफ्रिकेतून आलेल्या एका तीस वर्षीय तरुणाचा समावेश आहे.

परदेशातून साताऱ्यात आलेल्यांची संख्या 40वर

सातारा जिह्यात परदेशातून आणखी 30 नागरिक दाखल झाले असल्याने परदेशी नागरिकांची संख्या 40 झाली आहे. त्यांना गृहविलगीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे या नागरिकांवर आरोग्य विभाग लक्ष ठेवून आहे. तसेच, आरोग्य विभागामार्फत योग्य त्या उपाययोजना राबवल्या जात आहेत. 28 नोव्हेंबर रोजी 10, 29 नोव्हेंबर रोजी 3, तर 30 नोव्हेंबर रोजी 27 असे एकूण 40 परदेशी नागरिक आतापर्यंत जिह्यात आले आहेत. या सर्व परदेशी नागरिकांना त्यांच्या स्वतःच्या घरामध्ये गृहविलगीकरण करण्यात आले आहे. या सर्व परदेशी नागरिकांवर जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग, जिल्हा शासकीय रुग्णालयामार्फत ‘वॉच’ ठेवण्यात आला आहे. सर्व परदेशी नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. हे नागरिक देशात आल्यानंतर त्यांच्या 8 दिवसांत कोरोना चाचण्या घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार यांनी दिली.