प्रासंगिक – आयुष्यातील ‘तो’ श्रीमंत दिवस!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
संग्रहित फोटो

>> मनमोहन.रो.रोगे

सिंधुदुर्ग जिह्यातील एखादा तालुका सोडला तर संपूर्ण जिल्हा ते गोवा राज्यात दिवाळी झाल्यानंतर दशावतारी नाटकाचे खेळ सुरू होतात. मालवण भागात गावागावांत ठरावीक तिथीला दरवर्षी हा दशावतारी नाटकाचा खेळ ठरलेला असतो व त्याच रात्री तिथे जत्रा भरते. ही दशावतारी नाटके इतर नाटकांसारखी नसतात. म्हणजे जो खेळ असेल त्याची लिखित संहिता नसते. पौराणिक / ऐतिहासिक ज्या घटना आपण ऐकलेल्या असतात, त्यावर आधारित हे नाटय़प्रयोग होतात. संहिता नाही म्हणजे लेखक नाही, प्रॉम्प्टिंग नाही (अलीकडे काही सामाजिक प्रयोग होतात, त्यांची संहिता असू शकेल). नाटकात महत्त्वाचा घटक -नाटकाचा मार्गदर्शक म्हणजे दिग्दर्शक, पण तोही नाही. कसलेही नेपथ्य नाही. एक पडदा बांधतात व एक लाकडी बाकडा ठेवतात हेच नेपथ्य. राजमहालही तोच आणि जंगलही तेच. रंगभूषा-वेशभूषाकार कुणीही नाहीत. म्हणजे हे नट मेकअप करत नाहीत, वेशभूषा करत नाहीत असे नव्हे, तर हे सगळे ते नट स्वतःचे स्वतःच करतात. कधी कुणी रंगमचावर यायचे, पुणी कधी जायचे, कुणी कधी काय बोलायचे हे सगळे ते ते नट ठरवतात. बरे, हे सगळे अगदी व्यवस्थित होत असते. कसला गोंधळ गडबड नाही, नाटक पाहणाऱयाला हे सांगूनही खरे वाटणार नाही, इतके सुनियोजन असते.स्त्री पात्र पुरुष कलावंतच साकारतात. मात्र ते जातीवंत स्त्रीच वाटतात, कुठेही बीभत्सपणा नसतो. गेल्या 20/25 वर्षांत असे स्त्रीपात्र साकारणाऱया कलावंतांपैकी ओमप्रकाश चव्हाण यांना कमालीची लोकप्रियता लाभली, त्यांना ‘दशावतारातील बालगंधर्व’ म्हणतात. पूर्वीच्या काळी दशावतारी खेळ रात्री दोनच्या दरम्यान सुरू होऊन सकाळी साडेपाच-सहा वाजता संपत असत, तेव्हा रसिक प्रेक्षकांचीही खूप गर्दी असे. आता थोडे लवकर म्हणजे रात्री अकरा-साडेअकरा वाजता सुरू होतात आणि रात्री दोन वाजेपर्यंत संपतात, पण आता तशी गर्दी ना जत्रांना राहिली ना दशावतारी खेळांना. जत्रांची जी ओढ पूर्वी होती, ती काळाच्या ओघात कमी झाली.

पूर्वी गावांचे शहरीकरण झालेले नव्हते तेव्हा या जत्रांची लोकप्रियता प्रचंड होती. गावच्या अशा जत्रांना त्या-त्या गावचे कितीतरी मुंबईकर उपस्थित राहत असत. गावागावांतील मुला-मुलींना या जत्रांचे औत्सुक्य असे. कारण त्यांना हव्या असलेल्या छोटय़ा-छोटय़ा वस्तू त्यांना या जत्रांमध्येच विकत घेता येत. मुलांना त्या काळी कुणी तालुक्याच्या ठिकाणी विशेष नेत नसत आणि गावच्या दुकानात त्या वस्तू मिळतीलच याचा नेम नसे. बरे, त्या वस्तू मिळाल्या तरी मुलांकडे त्या काळी पैसे नसत. अशा दशावतारी खेळ व जत्रेच्या दिवशी तेव्हा लहान मुलांना त्यांचे आई-वडील, काका-आत्या, मावशी-मामा चार आण्यांपासून दोन रुपयांपर्यंत पैसे देत. त्यामुळे प्रत्येक मुलाकडे जत्रेदिवशी चार-पाच रुपये जमा होत असत. मुलांकडे वर्षाकाठी असे फक्त जत्रेलाच पैसे जमत. त्यामुळे त्या दिवशी मुलांना श्रीमंत झाल्यासारखे वाटे आणि ते पैसे मुक्तपणे खर्च करण्याची त्यांना मुभाही असे. हे जे स्वतःच्या मनाप्रमाणे वस्तू विकत घेण्याचे स्वातंत्र्य, सुख मिळे, त्यासाठी सगळी मुले-स्त्र्ाया या जत्रांची (धयकाल्यांची) आतुरतेने वाट पाहत.

आमच्या तारकर्ली गावचा धयकाला (जत्रा) दरवर्षी चंपाषष्ठीला असतो. त्यामुळे मुंबईत आल्यावर पहिली काही वर्षे मी चंपाषष्ठाr दिवशी खूप अस्वस्थ असे. हळूहळू अस्वस्थता कमी होऊन फक्त आठवण येत असे. लहानपणीच्या आठवणी पुन्हा बालपणात घेऊन जात. ती चार-आठाणे, रुपया प्रेमाने देणारी आपली माणसे आता उरली नाहीत. आता त्या रुपया-दोन रुपयांची गरज नसली तरी ती माणसे आपल्यात नाहीत याचे वाईट वाटे. मात्र कितीतरी वर्षांत चंपाषष्ठाrच्या जत्रेला माझे जाणे झाले नाही आणि माझी मुले लहान असताना म्हणजे वीस-बावीस वर्षांपूर्वी एके वर्षी मी नेमका जत्रेदिवशी गावी हजर होतो आणि त्याच सर्व जुन्या आप्तस्वकीयांच्या आठवणी अस्वस्थ करीत होत्या, गावी असल्याने आठवणी तीव्रतेने येत होत्या. तितक्यात आमच्या दादांनी (मोठे काका) मला हाक मारली आणि त्यांच्यापुढे जाताच त्यांनी वीस रुपयांची नोट माझ्यापुढे केली. मला काही कळेना म्हणून मी विचारले, ‘‘दादा, काही आणायचे आहे का?’’ तर म्हणाले, ‘‘नाही, मला काही नको, हे पैसे घे.’’,‘‘अहो, कसले पैसे ते तर सांगा’’ असे मी म्हणताच दादा बोलले, ‘‘झिला, आज धयकालो हा नाय, म्हणून तुका देतय.’’ हे दादांचे वाक्य ऐकताच मी गहिवरून गेलो, माझा गळा दाटून आला, डोळे पाण्याने भरले, ओठातून शब्द फुटेना अशी परिस्थिती झाली. मी दादांचे हात हातात घेऊन ‘‘दादा, मी आता लहान आहे का? मला कशाला पैसे? उलट तुम्ही माझ्याकडून घ्या.’’ इतकेच कसेतरी बोललो. परत एकदा माझ्या जन्मघरात मी बालपण अनुभवत होतो. डोळ्यातून अश्रू ओघळत होते. माझे वाक्य पूर्ण होताच दादा म्हणाले, ‘‘असू दे ठेव, तुझ्याकडे मॉप पैसे आसतील तरी हे घे.’’ त्यांचा आग्रह मोडण्याचे धाडस काही मला झाले नाही. उलट अशी एक तरी मोठी व्यक्ती, प्रेम करणारा माणूस आज (तेव्हा) हयात आहे याचा आनंद वाटला. देवाचे आभार मानले. नंतर सात-आठ वर्षांनी दादा आम्हाला सोडून गेले. त्या वीस रुपयांनी मला त्यावेळी काय दिले नव्हते? त्याक्षणी तरी जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस मी होतो. दरवर्षी चंपाषष्ठीला मला तो ‘श्रीमंत’ दिवस आठवतो.